‘अटल’ वाणी!

    भारतीय राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ज्यांचं वर्णन करता येईल असे अजातशत्रू नेते म्हणजे भारतरत्न कै. अटल बिहारी वाजपेयी. स्वभावातला सुसंस्कृतपणा, नम्रता, भाषेचे सखोल ज्ञान आणि कवी मन यांचा अप्रतिम मिलाफ म्हणजे अटलजींची भाषणे. वक्तृत्व असे असावे की आपले समर्थकच नव्हेत तर आपले विरोधकसुद्धा हरखून जातील याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटलजी. ते संसदेत बोलायचे तेव्हा भूतपूर्व पंतप्रधान स्व. नेहरूदेखील त्यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकत असत! इतकी विलक्षण वक्तृत्व प्रतिभा कशी निर्माण होते याचं उत्तर देताना अटलजी एकदा म्हणाले होते; ‘हा आमचा परंपरागत गुण आहे. माझे वडील उतम भाषणे करीत असत. मात्र ते नेते नसल्याने त्यांच्या या गुणाचे कौतुक झाले नाही!’

आपली भाषणे तयार होण्याची प्रक्रिया काय हे सांगताना अटलजी म्हणतात; 

“मेरे भाषणों में मेरा लेखक मन बोलता है लेकिन राजनेता भी चुप नही रहता। राजनेता लेखक के समक्ष अपने विचार रखता है और लेखक पुनः उन विचारों को पैनी अभिव्यक्ति देने का प्रयास करता है। मै तो मानता हूँ कि मेरे राजनेता और मेरे लेखक का परस्पर सम्मनव्यय ही मेरे भाषण में दिखाई देता है। मेरा लेखक राजनेता को मर्यादा का उल्घंन नही करने देता।“ लेखक आणि नेता या दोन्ही भूमिकांतील द्वंद्व इतक्या तरल शब्दांत अन्य कोण बरे कथन करू शकेल? 

संसदेत बडे-बडे नेते इंग्रजीतून भाषणे देत तेव्हा अटलजी मात्र हिन्दीतूनच त्यांचे विचार मांडत. संसदच कशाला? संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेतदेखील त्यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री या नात्याने भाषण केले तेदेखील हिंदीमधूनच. अशा परिषदेत हिंदीतून भाषण देणारे ते पहिले भारतीय मंत्री. या भाषणात संयुक्त राष्ट्रसंघाला त्यांनी मानवतेच्या दृष्टीने भारत कायमच आघाडीवर असेल असे सांगितले होते. या भाषणात कोमल मानवतावादी दृष्टीकोन मांडणाऱ्या वाजपेयीजींनीच पुढे एका अशाच भाषणात मात्र ‘आम्ही सर्व जगला अणुबॉम्ब मुक्त व्हा अशी विनंती करत होतो. मात्र; आमच्या या विनंतीकडे कोणीही गांभीर्याने पाहिलं नाही. सारं जग अणुशस्त्रांनी युक्त असताना भारतालादेखील स्वसंरक्षणार्थ अणुचाचणी करणे भाग होते. यात आम्ही काहीही गैर केलेले नाही.’ अशा शब्दांत कणखरपणे आपल्या देशाची बाजू मांडली.

प्रसन्न स्वभाव असलेल्या अटलजींच्या भाषणांतदेखील ही प्रसन्नता उठून दिसे. क्वचित काहीवेळा मिश्कीलपणे बोलणाऱ्या या वक्त्याने विनोद करताना वा इतरांवर टीका करतानादेखील कधीही आपली पातळी सोडली नाही हे विशेष. एखादा राजकीय टोमणा मारतानाही त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे निरागस असे. त्यात कधी द्वेष दिसून आला नाही हे त्यांचे वेगळेपण त्यांच्या आणि मनाचे मोठेपणदेखील. फार क्वचित प्रसंगी त्यांचा संताप भाषणातून व्यक्त होत असे. यातील दोन गाजलेली भाषणे म्हणजे पापस्तानला त्यांनी दिलेले उत्तर आणि संसदेत बहुमत मिळवण्यास केवळ एका सदस्याच्या कमतरतेने अपयश आल्यावर त्यांनी केलेले भाषण. ‘आप दोस्त बदल सकते है; लेकीन पडोसी नहीं बदल सकते|’ इतक्या सहज शब्दांत वाजपेयींनी पापस्थानला त्याच्याच भूमीवरून सत्यस्थितीची जाणीव करून दिली होती. अविश्वास प्रस्ताव हरल्यावर त्यांनी संसदेत केलेले भाषण तर ‘नैतिकता’ या गुणाचा परिपाठच होता असे म्हणायला हरकत नसावी. विरोधी पक्षाचे ससंदर्भ वाभाडे काढत, सात्विक संताप व्यक्त करतानाच दुसरीकडे हे भाषण संपवताच मी माझा राजीनामा मा.राष्ट्रपती महोदयांना सुपूर्द करायला चाललो आहे; असे वाजपेयीजींनी ज्या सहजतेने सांगितले तिला पाहता त्यांच्या विरोधकांनाही क्षणभर धक्का बसला असेल.

संघाचे स्वयंसेवक राहीलेले अटलजी कोणताही भपकेबाजपणा न करता अतिशय साधेपणाने आणि सहजतेने सभांमधून वावरत हा त्यांचा मोठेपणा. देशप्रेम ही भावना त्यांच्या दृष्टीने सर्वोपरी होती. ते म्हणतात;

“भारत ज़मीन का टुकङा नही है, जीता-जागता राष्ट्र पुरुष है। हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखा है। कश्मीर किरिट है, पंजाब और बंगाल दो विशाल कंधे हैं। विनध्याचल कटि है, नर्मदा करधनी है। पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जँघाए हैं। कन्याकुमारी उसके चरण हैं, सागर उसके चरण पखारता है। पावस के काले-काले मेघ इसके कुंतल केश हैं। चाँद और सूरज इसकी आरती उतारते हैं। यह वंदन की भूमि है, यह अर्पण की भूमि है, अभिनन्दन की भूमि है। यह तर्पण की भूमि है। इसका कंकर-कंकर शंकर है, इसका बिंदु-बिंदु गंगाजल है। हम जियेगें तो इसके लिये और मरेंगे तो इसके लिये।”

या देशाच्या स्वातंत्र्यसाठी ज्यांनी रक्त सांडले अशा वीरांप्रतीचा आदरदेखील त्यांच्या भाषणांत वेळोवेळी पाहायला मिळतो. स्वा. सावरकरांवर त्यांनी केलेले भाषण हे या बाबतीतले मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. या भाषणात ते म्हणतात; 

“हम कण है तो सावरकर पर्बत है| हम लोग तो एक बिंदु है सावरकर तो सिन्धु है| मगर कण में भी बिंदु में भी वही क्षमता है| हम सावरकर जी को समझने का प्रयत्न करें| उनकी विचारधारा का विश्लेषण करें| सावरकरजी के चिन्तन के बारे में अनुसन्धान करें| और सावरकर के सन्देश को घर-घर तक व्यक्ति-व्यक्ति तक पहुचाने का प्रयास करें|”

वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि| हे सूत्र अटलजींच्या वक्तृत्वाला तंतोतंत लागू पडते. शांत- संयमित मात्र आवश्यक तेथे वेळप्रसंगी कठोर होणारी वक्तृत्वाची देणगी ही अतिशय दुर्मिळ असते. गेल्या सुमारे एक तपाहूनही अधिक काळ ही ‘अटल’वाणी जणू मुकच होती आणि आता तर तिने पूर्णविरामच घेतला आहे.

मात्र मनमोहक पण संयत वक्तृत्व शैली लाभलेल्या राजकीय वक्त्यांच्या जागतिक यादीत कै. अटल बिहारी वाजपेयी हे नाव कायम वरच्या क्रमांकावर असेल….

डॉ. परीक्षित शेवडे

pareexit.shevde@gmail.com

ट्विटर-@DrPareexitS

(मंडळी, तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया दिलेल्या प्रतिक्रिया बॉक्समध्ये नक्की कळवा.

लिहा- writeto@marathibrain.com)

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: