Site icon MarathiBrain.in

आता नंबर एलपीजी-सिएनजीचा !

पेट्रोल-डिझेलच्या दैनिक किंमतवाढीनंतर आता सिएनजी, एलपीजी चे दरही महागले आहेत.

 

वृत्तसंस्था, एएनआय

नवी दिल्ली, १ ऑक्टोबर

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबरोबर आता सीएनजीच्याही दरात वाढ झाली आहे. सोबतच विमान इंधनाचे (एटीएफ) देशांतर्गत दर २६५० रूपये प्रति किलोलीटर झाले असून हवाई प्रवासासाठी आता प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. या नव्या किमती आज मध्यरात्रीपासून लागू झाल्या आहे.

दररोज वाढ होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे लोक आधीच त्रस्त असताना आता सामान्य माणसाला महागाईची तिहेरी झळ बसणार आहे. पेट्रोल-डिझेल तर आहेतच, सोबत आता सिएनजी, एलपीजी व विमान इंधनाच्या दरांतही वाढ झाली आहे. दिल्लीत एलपीजीचे दर ₹१.७० प्रति लिटर इतके वाढले आहे, तर सिएनजीचे नवे दर ₹ ४४.५० प्रति लिटर इतके झाले आहे. विमानाचे देशांतर्गत इंधन दर २६५० रुपये प्रति किलोलिटर इतके झाले आहे. ही वाढ १ ऑक्टोबरपासून लागू होईल. गेल्या महिन्यात एटीएफच्या दरात २२५० रुपये प्रति किलोलीटर वाढ झाली होती.

सबसिडी असलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत २.८९ रुपयांनी वाढून ५०२.४ रुपये प्रति सिलिंडर झाली आहे व विना सबसिडी असलेला सिलिंडर ५९ रुपयांनी महागले आहे.

इंडियन ऑइलने जारी केलेल्या निवेदनात, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमती आणि विदेश मुद्रा विनिमय दरातील चढ-उतारांमुळे ही वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

◆◆◆

Exit mobile version