आधारमुळे दूरध्वनी क्रमांक बंद पडणार नाही!

0
25

आधार क्रमांकाच्या पुनर्सत्यापनात दूरध्वनी क्रमांक चुकीचा जरी आढळला तरी तो बंद पडणार नसल्याचे दूरसंचार विभाग आणि युआयडीएआयने संयुक्त निवेदनातून जाहीर केले आहे. 

 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर

आधारमुळे मोबाईल क्रमांक बंद होणार नसल्याचे संयुक्त आश्वासन टेलीकॉम विभाग आणि युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (युआएडीएआय) आज दिले आहे.

आधार क्रमांक फेरतपासणीच्या वेळी दिलेले दूरध्वनी क्रमांक जर नवीन पुनर्तपासणीच्या (रिव्हेरिफिकेशन) वेळी चुकीचे आढळले किंवा विसंगत असल्याचे दिसले, तर संबंधित क्रमांक आधार कार्डपासून वेगळे केले जाऊ शकते. यामुळे देशातील आधार कार्डशी दूरध्वनी क्रमांक संलग्न असलेल्या सुमारे ५० कोटी वापरकर्त्यांचे दूरध्वनी क्रमांक बंद पडू शकतात, अशी वार्ता काही दिवसांआधी प्रकाशित झाली होती. मात्र हे वृत्त चुकीचे  आणि काल्पनिक असल्याचे आधार प्राधिकरणाने आज जाहीर केले आहे. यासाठी केंद्रीय दूरसंचार विभाग (टेलीकॉम मिनिस्ट्री) आणि भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरण (आधार-युआयडीएआय) ने आज एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. या निवेदनात आधार कार्डमुळे ग्राहकांचे दूरध्वनी क्रमांक बंद पडणार नसल्याचे सांगितले आहे.

आधार क्रमांक माहित असला तरी पैसे काढता येणार नाही : युआयडीएआय

आधार प्रकरणावरील निकाल देताना काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, ‘खासगी कंपन्या कोणत्याही सत्यापनाच्या कामासाठी आधार क्रमांक वापरू शकत नाहीत. दूरध्वनी क्रमांक किंवा बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची आता काही गरज नाही आणि खासगी कंपन्या ग्राहकांकडून याची मागणीही करू शकत नाही.’ सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर शासनाच्या दारी आधारशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा सुरू आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात खाजगी कंपन्या आधार क्रमांकची मागणी करू शकत नाही, असे म्हणण्यात आले असले तरी, सध्या देशातील ५० कोटींपेक्षा जास्त ग्राहकांचे दूरध्वनी क्रमांक आधारशी संलग्न आहेत. त्यामुळे आधारऐवजी दुसरा ओळखीचा पुरावा न दिला गेल्यास संबंधित दूरध्वनी क्रमांक बंद होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासाठी ग्राहकांना मुबलक वेळ आणि काही इतर पर्याय देता येतील का, याचा विचार शासन करत आहे.

याविषयी स्पष्टीकरण देताना दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन म्हणाल्या की, ‘सरकारला ग्राहकांच्या प्रश्नांविषयी काळजी आहे. आधार ऐवजी मोबाईल क्रमांकला संलग्न करण्यासाठी दुसरे पर्याय उपलब्ध होईपर्यंत ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे.’

 

◆◆◆

पाठवा तुमचे लिखाण, तुमच्या परिसरातील घडामोडी writeto@marathibrain.in वर. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here