Site icon MarathiBrain.in

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ‘भारत बंद’

पेट्रोल, डिझेल व एलपीजीच्या सतत होणाऱ्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने सोमवारी ‘भारत बंद’ पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला असून जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेत बंदबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे ११० डॉलर प्रति बॅरल होती, तेव्हा मुंबईत पेट्रोलचा दर ८० रुपये तर डिझेलचा दर साधारणपणे ६४ रुपये प्रति लिटर होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे ८० डॉलर प्रति बॅरल म्हणजेच २०१४च्या तुलनेत ३० डॉलरने कमी आहे. तरीही आज मुंबईत पेट्रोलचे दर ८७.८९ रुपये आणि डिझेलचे दर ७७.०९ रुपये एवढे आहेत. सरकार इंधनावर कर आणि अधिभार लावून सर्वसामान्य जनतेची लूट करीत आहे. इंधनदरवाढीमुळे वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दै. लोकसत्ता

सरकारने तात्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे व या इंधनाच्या वाढत्या दरांना कमी करून नागरिकांना दिलासा द्यावी, ही या बंदची प्रमुख मागणी आहे.

● विभागनिहाय बंदचे नेतृत्व :

मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

सातारा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

अहमदनगर – विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

नागपूर – सरचिटणीस मुकुल वासनिक

या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

आजच्या ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनीही जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले आहे.

 

◆◆◆

Exit mobile version