कसे तयार कराल ‘व्हाट्सऍप स्टिकर्स’ ?

तुम्हाला हवे असलेले व्हाट्सऍप स्टिकर्स तुम्ही स्वतः तयार करू शकता आणि ते प्ले स्टोरवर पब्लिश करून इतरांसाठीही उपलब्ध करून देऊ शकता. जाणून घ्या व्हाट्सऍप स्टिकर तयार करण्याची पद्धत…

 

मराठी ब्रेन | सागर बिसेन 

शुक्रवार, दि. ९ नोव्हेंबर

संदेशन अनुप्रयोग (अप्लिकेशन) ‘व्हाट्सऍप’ने अलीकडेच एक नवे वैशिष्ट्य (फिचर) उपलब्ध केले आहे. ईमोजी, GIFs सोबतच आता व्हाट्सऍप वापरकर्त्यांना स्टिकर्स पाठवण्याचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. विविध भावभावना आणि हावभाव अधिक प्रभावीरित्या संदेशांतून व्यक्त करण्यासाठी या स्टिकर्सचा उपयोग करता येतो.

ऐन दिवाळीच्यावेळी व्हाट्सऍपने उपलब्ध करून दिलेला हा पर्याय सगळीकडे चर्चेचा विषय झाला आहे. व्हाट्सऍपने आपल्या ब्लॉगवर प्रकाशित लेखात लिहिले आहे की, “हसरे क्षण किंवा दुःखी मन यांच्या भावना शब्दांपेक्षा स्टिकर्समधून अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येतात. यासाठी आम्ही आमच्या डिझायनर्सकडून काही स्टिकर्स तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, तर काही स्टिकर पॅक इतरांकडून तयार केलेले असणार आहेत.”

सुरुवातीच्या काही दिवसांत व्हाट्सऍपकडून देण्यात आलेले स्टिकर्सच वापरता येत होते, मात्र आता स्टिकर निर्मितीचा पर्याय सर्वांसाठी खुला आहे. म्हणजे वापरकर्ते स्वतः त्यांचे स्टिकर्स बनवू शकतात आणि गूगल प्ले स्टोरवर प्रकाशित करून इतरांनाही ते वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून देऊ शकतात. प्ले स्टोरवर आलेले हे स्टिकर्सपॅक व्हाट्सऍप वापरकर्ते डाउनलोड करून आपल्या व्हाट्सऍप अनुप्रयोगासाठी वापरू शकतात.

मात्र हे स्टिकर्स बनवावे कसे? हा मुख्य प्रश्न आहे. खरंतर, हे स्टिकर्स बनवणे सोपे आहे, फक्त त्याची माहिती आणि पद्धती आपल्याला माहीत हवी. खाली दिलेल्या सहा मुद्यांना लक्षात घ्या आणि त्यांचा क्रमवार वापर करत स्टिकर्स बनवून ते इतरांनाही पाठवा.

 

● स्टिकर्स तयार करण्याची पद्धत:

  1. सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या ‘गुगल प्ले स्टोर ‘(Google Play Store) वर जा. तिथे जाऊन ‘स्टिकर मेकर फॉर व्हाट्सऍप‘ (Sticker Maker for WhatsApp) हे अनुप्रयोग (अप्लिकेशन) डाउनलोड करा.
  2. वरील अनुप्रयोग तुमच्या मोबाईलमध्ये स्थापित (इन्स्टॉल) झाल्यावर त्यास उघडा. त्यानंतर तेथील ‘क्रियेट ए न्यू स्टिकरपॅक‘ (Creat A New Stickerpack) हा पर्याय निवडा. त्यानंतर हे स्टिकर तयार करणाऱ्याचे आणि स्टिकरपॅकचे नाव त्यात लिहा.
  3. यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रिनवर एक ट्रे चे चिन्ह (आयकॉन) दिसेल. त्यावर क्लिक करून अनुप्रयोगाला योग्य ती परवानगी द्या।
  4. त्यानंतर ‘सिलेक्ट फाईल’ (Select File)  हा किंवा ‘टेक फोटो’ (Take Photo) हा पर्याय निवडून तुम्हाला हव्या असलेल्याया फोटोची निवड करा. त्यानंतर त्या फोटोच्या चारही बाजुंनी तुम्हाला हव्या तशा प्रकारची बाह्यरेखा (आऊटलाईन) ओढा.
  5. त्यानंतर ‘सेव स्टिकर’ (Save Sticker) हा पर्याय निवडून ते स्टिकर जतन करून ठेवा. अशाप्रकारे हवे तितके स्टिकर्स तुम्ही तयार करू शकता. एका स्टिकरपॅकमध्ये कमीतकमी तीन ते जास्तीतजास्त तीस स्टिकर्स जतन करता येतील.

6. यानंतर हे स्टिकरपॅक गूगल प्लेवर       प्रकाशित करून घ्या. ज्या वापरकर्त्यांना हे   स्टिकर्स हवे असतील ते डाउनलोड करून त्यांचा वापर करू शकतील. ह्या स्टिकर्स किंवा ऍपला तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबतही शेयर करू शकता.

 

● महत्त्वाचे :

व्हाट्सऍपने उपलब्ध करून दिलेला हा पर्याय नक्कीच मजेशीर आणि भावनांना अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यासारखा आहे. मात्र, हे स्टिकर्स तयार करताना किंवा शेयर करताना थोडी काळजी घ्या. कुणाच्या व्यक्तित्वावर, अभिव्यक्तीवर दगा आणतील असे स्टिकर्स तयार करू नका आणि समाजावर व समाजातील विविध घटकांवर या स्टिकर्सचा विपरीत परिणाम होऊ नये याची काळजी घ्या.

 

◆◆◆

विविध विषयांवरील माहिती मराठी जाणून घेण्यासाठी भेट देत राहा www.marathibrain.com वर.

तुम्हालाही काही लिहायचं असेल? तर लिहा writeto@marathibrain.com ला. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: