‘कुलदीप नय्यर’, लेखणीची ताकद सिद्ध करणारे व्यक्तिमत्व!
दीर्घकाळ आपले आयुष्य पत्रकारितेत झोकून देणारे ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध लेखक ‘कुलदीप नय्यर’ यांचे काल रात्री दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
देशातील विविध वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनाचे काम केलेल्या कुलदीप नय्यर यांना आधुनिक पत्रकारितेचे भीष्म पितामहही म्हटले जाते. त्यांनी प्रत्येकवेळी शासनकर्त्यांना आरसा दाखवण्याचे कार्य केले आहे. पत्रकारिता हा जरी त्यांचा पेशा असला , तरी कुलदीप नय्यर यांचे जग बहुआयामी होते. अष्टपैलूत्व लाभलेले पत्रकारितेतील एक महत्वाचे व्यक्तिमत्व, ‘ कुलदीप नय्यर’ यांच्या रुपात आज भारताने गमावले आहे. त्यांच्या जाण्याने आज एक निर्भीड व वरिष्ठ पत्रकार भारताने हरवला आहे.
कुलदीप नय्यर यांच्याबद्दल काही ठळक बाबी:-
- कुलदीप नय्यर यांनी विविध महत्वाच्या भारतीय दैनिकांमध्ये स्तंभलेखनाचे कार्य केले आहे.
- ‘अंजाम’ या उर्दू दैनिकाचे पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरूवात केली, त्यानंतर दिल्लीतील ‘स्टेट्समन’ या दैनिकाचे संपादकपद त्यांनी भूषवले.
- एक प्रमुख मानवाधिकार कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती.
- पत्रकारितेतील कार्यासोबतच त्यांनी १५ पुस्तकेही लिहिली आहेत. भारत-पाक संबंधांवरील त्यांची पुस्तके खूप गाजली आहेत.
- आणीबाणीच्या काळात नय्यर हे तुरुंगातही गेले होते.
- नय्यर यांना २०१५ मध्ये ‘रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले आहे.
- १९९७ मध्ये त्यांची राज्यसभेवरही नियुक्ती करण्यात आली होती.
कुलदीप नय्यर हे सक्रिय मानवाधिकार कार्यकर्ते व सोबतच धर्मनिरपेक्ष संघराज्याचे पुरस्कर्ते होते. भारतीय लोकशाहीला अधिक मजबूत करण्याचे कार्य त्यांच्या पत्रकारितेतून झाले आहे. संपूर्ण आयुष्य पत्रकारितेत घालवलेले कुलदीप नय्यर भारतीय पत्रकारितेसाठी मार्गदर्शक व प्रेरणास्रोत आहेत.
अशा निर्भीड लेखक-पत्रकाराला व मानवीय हक्कासाठी लढणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन! भावपूर्ण श्रद्धांजली!!
◆◆◆