कोकणात जोरदार पावसाचा इशारा

विदर्भ, मध्य महाराष्ट्रातही सरी कोसळणार
पुणे – पुढील दोन दिवसांमध्ये कोकणात जोरदार, तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने सोमवारी (ता. 13) दिला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात कालपासून श्रावणधारा बरसत आहेत.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापुरात अनेक ठिकाणी सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या शुक्रवार (ता. 17) पर्यंत कोकण, विदर्भात, तसेच मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. तर, मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे.

ओडिशा आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्यास सुरवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. येत्या बुधवार (ता. 15)पर्यंत केरळ, कर्नाटक, घाटमाथ्यावर पाऊस आणखी वाढणार आहे. मॉन्सूनचा प्रवाह वाढल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली. सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये अतिजोरदार पावसाची शक्‍यता आहे. तर, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर समुद्र खवळणार असून, मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात स्वातंत्र्यदिनी पावसाच्या एक-दोन सरी
पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस पावसाच्या एक-दोन सरी पडतील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे येत्या बुधवारी (ता. 15) स्वातंत्र्यदिनी शहरात पावसाच्या सरी कोसळतील. आज दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. अधून-मधून पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एक जूनपासून आतापर्यंत शहरात 342.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा 38.5 मिलिमीटर कमी पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.
सौजन्य: दैनिक सकाळ

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: