मुंबई, २६ ऑक्टोबर
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात उर्ध्व गोदावरी धरण समूहातून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या एक सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला.
गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिल आहे. आम्ही तातडीने या याचिकांवर सुनावणी घेऊ शकत नसल्याचे न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. यामुळे गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून ८.९९ टीमसी पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याचा मार्ग आता मोकळा झाला.
गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांचे आमदार निवसावर आंदोलन
पाटबंधारे विभागाने दोन दिवसांपूर्वीच जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने नाशिकमधील चार धरणांचे पाणी जायकवाडीकडे वळते करण्याचा निर्णय घेतला होता. महामंडळाच्या या निर्णयाला नाशिकच्या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
अलीकडे, जायकवाडी धरणात जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात कोणताही अडथळा नागरिकांनी आणू नये असे आवाहन नगर मुळा पाटबंधारे विभागाच्या एका प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आले होते.
‘मुळा नदीतून वाहणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करु नये. तसेच पाण्याचा कोणत्याही प्रकारे उपसा करु नये, तसे केल्याचे आढळल्यास अथवा करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर आवाहन नगर मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.’ दै. सामना
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात पाणी सोडण्यात आले आहे. हे धरण भरल्यानंतर ते पाणी पुढे सोडण्यात येईल. दुसरीकडे मुळा धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयालाही स्थानिकांनी विरोध केला आहे, तर नाशिकच्या दारणा धरणावरही नागरिकांनी आंदोलन केले आहे.
◆◆◆
पाठवा तुमच्या परिसरातील बातम्या आणि घडामोडींची माहिती थेट ई-मेलने. लिहा writeto@marathibrain.com ला.