‘ट्विटरकट्टा’ उपक्रमाबद्दल

रेडिओवरील रेकॉरडेड मुलाखती, टीव्हीवरील चर्चासत्र, लाईव्ह गप्पा असे विविध कार्यक्रम तर आपण आधीपासूनच बघत आणि ऐकत आलेलो आहोत. त्यांमधून प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना फोन किंवा पत्रव्यवहार यांद्वारे सहभाग नोंदवतानाही आपण बघितलेलं आहे. मात्र या सर्व गोष्टींना काही मर्यादा येतात, कधी वेळेच्या, कधी लोकांच्या सहभागाच्या, प्रक्षेपणाच्या, इत्यादी, इत्यादी. आजच्या तंत्रज्ञान आणि आंतरजालाच्या काळात, आता या सर्व गोष्टी प्रत्येकचजण वापरतो असे नाही. आज माणूस डिजिटल व नेटकरी झाला आहे. अशावेळी लोकांना दरवेळी काहीतरी आगळंवेगळं, अभिनव व सर्वसमावेशक असंच हवं असतं. मग अशाच काहीशा कल्पना आजच्या तरुणांना सुचत जातात व लोकांसमोर त्या मांडली जाते. लोकांचा सहभाग व वेगळेपणाची छाप त्यातून पडली की त्यांस पाठिंबाही तितकाच मिळत जातो.

आंतरजालाच्या व स्मार्टफोनच्या या वर्तमान जगात रेडिओ, टीव्ही यांसारख्या पारंपरिक माध्यमांना बाजूला सारून विविध उपक्रम आजचा तरुणवर्ग राबवत असतो. याचंच एक उदाहरण म्हणजे ‘ट्विटरकट्टा’. पारंपरिक माध्यमांच्या लाईव्ह कार्यक्रमांच्या धर्तीवरच मात्र स्वरूपाने पूर्णतः वेगळा असलेला ‘ट्विटरकट्टा’ हा उपक्रम ‘मराठी विश्वपैलू’ व ‘मराठी विचारधन’ या वस्तुनिष्ठ मराठी ट्विटर खात्यांनी सुरू केला. विविध क्षेत्रातील लोकांशी, मग ती खूप मोठी नामवंत व्यक्ती असो किंवा सामान्य ट्विटरकरांमधीलच आगळंवेगळं व्यक्तिमत्व असो, इतरांना ट्विटरच्या माध्यमातून ठराविक वेळी संवाद साधता यावा हा या ‘ट्विटरकट्टा’चा मूळ हेतू. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून ट्विटरकट्टा हा उपक्रम ट्विटरकरांच्या व एकूणच मराठी जनतेच्या प्रेमामुळे व सहकार्याने अव्याहत सुरू आहे. आतापर्यंत ट्विटरकट्टाचे एकूण ४५ सत्र पूर्ण झाले असून संगीत, प्रसारमाध्यम, राजकारण, समाजकारण, आर्थिक, चित्रपट, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील लोकांशी ट्विटकरांना संवाद साधता आला आहे, गप्पा मारता आल्या आहेत.

शिवाय, मराठी ट्विटरकरांमधील काही लोकांशीही गप्पा मारण्याचे निमित्त या कट्ट्यातून मिळाले आहे.

नेमकं ‘ट्विटरकट्टा’ म्हणजे काय?

विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, पडद्यामागे राहिलेली उत्कृष्ट व्यक्ती,समाजसेवक, विचारवंत व ट्विटरच्या माध्यमातून नावारूपास येणारे प्रसिद्ध नागरिक यांच्याशी ट्विटरद्वारे लोकांशी थेट चर्चासत्राचा कार्यक्रम म्हणजे ‘ट्विटरकट्टा’. हा उपक्रम म्हणजे कट्ट्यावरील पाहुणे व्यक्तींशी थेट इतरांना प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधण्याची मिळालेली संधी.

ट्विटरकट्टाचे स्वरूप

पारंपरिक माध्यमांसारखी खूप मोठी नियमावली व औपचारिकता न ठेवता, अगदी, साधा व सरळ, सर्वांना सहभागी होता येईल असा हा उपक्रम आहे.

ट्विटरवरील लोकांच्याच सूचनांनुसार, त्यांच्या ओळखीच्या किंवा संपर्कात असलेल्या मान्यवर व्यक्तींना, प्रासंगिकतेनुसार ट्विटरकट्टावर आमंत्रित केले जाते.

ट्विटरकरांना संवादातून काय अपेक्षित आहे, त्यांना काय उत्तरे अपेक्षित असतात याची पूर्वसूचना तेवढी आमंत्रित पाहुण्यांना दिलेली असते.

ट्विटरकट्टाच्या नियोजित तारखेच्या एक दोन दिवस आधी ‘मराठी विश्वपैलू’, ‘ मराठी विचारधन’, ‘मराठी ट्विटरकट्टा’ किंवा इतर मराठी खात्यावरून कट्ट्याची तारीख, वेळ नेटकऱ्यांना कळवली जाते.

कट्ट्याच्या वेळी निमंत्रित पाहुण्यांना काही प्रास्ताविक बोलायचं असेल तर ते ट्विट्सच्या माध्यमातून सुरुवातीला व्यक्त होतात व सहभागी ट्विटरकरांना त्यानंतर प्रश्न करण्याची मुभा असते.

सहसा ट्विटरकट्टाचा कालावधी हा एक तासांचा असतो, मात्र लोक सहभाग, प्रश्नांचा ओघ अथवा पाहुण्याकडे उपलब्ध वेळेनुसार त्यात वाढही केली जाते. वेळ, व्यस्तता अशा विविध बाबींच्या मर्यादेतसुद्धा सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे मिळावीत यासाठी आयोजकांचा प्रयत्न असतो.

सहभागी कसे व्हाल?

ट्विटर हे सर्वांसाठी खुले असलेले एक सामाजिक माध्यम आहे, तसंच ट्विटरकट्टासुद्धा सर्वांसाठी खुले असलेलं एक अभिव्यक्तीचं व्यासपीठ आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी फक्त उपक्रमाच्या वेळी तुम्हाला तुमच्या ट्विटर खात्यात प्रवेश करून ‘#ट्विटरकट्टा’ हा टॅग वापरून ट्विटायचं आहे. आता ट्विट नेमकं कशाचं करायचं? तर, तुम्हाला आमंत्रित व्यक्तीला प्रश्न विचारायचे असतील, तुमच्या मनातील विचार त्यांच्यापर्यंत पोचवायचे असतील अथवा एकूणच काही सूचनाही करायच्या असतील तर तुम्ही टॅगचा वापर करून ते ट्विट करू शकता. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यावर काही बंधने नाहीत, उलट तो व्यक्तिशः स्वेच्छेचा प्रश्न आहे.

तर मग…सहभागी व्हा पुढील ट्विटरकट्टामध्ये आणि अधिक माहितीसाठी संलग्नित राहा @TweetKattaमराठी ट्विटरकट्टा’ या ट्विटर खात्यासह.

तुमचे मत, तुमच्या सूचना, तुमचे अभिप्राय यांचे स्वागत आहे. शिवाय, तुमच्या आवडीच्या लोकांना कट्ट्यावर आमंत्रित करायचं असेल किंवा उपक्रमात आम्हाला सहकार्य करायचं असेल तर नक्की कळवा.

धन्यवाद! लोभ असावा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: