Site icon MarathiBrain.in

ड्रॅगन पॅलेसमध्ये होणार ‘आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट शांती परिषद’

नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर 

नागपूर जिल्ह्यातील कामठीच्या सुप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस येथे ‘आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट शांती परिषद’ दिनांक १७ व १८ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे यांनी आज दिली. श्रीमती कुंभारे यांनी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

श्रीमती कुंभारे यांनी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिष्ट शांती परिषद’ ची माहिती दिली.

धम्मचक्र परिवर्तन सोहळयाचा कार्यक्रम नागपूरच्या दिक्षाभूमी येथे दरवर्षी आयोजित केला जातो. या कार्यक्रमास बौद्ध धर्माचे जगभरातील अनुयायी मोठ्या संख्येने येतात. यावेळी नागपूर परिसरातील बौद्ध स्थळांनाही हे अनुयायी भेटी देतात. यानिमित्ताने ड्रॅगन पॅलेस येथेही लाखो अनुयायी दरवर्षी येतात. याचे औचित्य साधून या आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट शांती परिषदेचे आयोजन केले असल्याचे श्रीमती कुंभारे यांनी सांगितले.

या आंतरराष्ट्रीय बुध्दिष्ट शांती परिषदेस केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फॉन्स उपस्थित राहणारआहेत. चीन, जपान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड  या देशांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. देशातील बौद्ध स्थळांच्या पायाभूत सुविधा, येथील दळणवळणाची साधने,  पाली भाषेतील बौद्ध साहित्य आदी विषयांवर परिषदेत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

( स्त्रोत: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय)

♦♦♦

Exit mobile version