नैसर्गिक आपत्तींमुळे भारताचे ५.८ लाख कोटींचे नुकसान

संयुक्त राष्ट्रसंघाने प्रकाशित केलेल्या अहवालात गेल्या २० वर्षांत हवामान बदलांमुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे २९०८ अब्ज डॉलरचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

संयुक्त राष्ट्रसंघ, ११ ऑक्टोबर

गेल्या २० वर्षांत ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे भारताला ५.८ लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या हवामान बदल आणि त्यांमुळे आलेल्या नैसर्गिक आपत्ती यांसंबंधीच्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

स्रोत

संयुक्त राष्ट्रसंघाने प्रकाशित केलेल्या ‘आर्थिक नुकसान, गरिबी आणि आपत्ती १९९८-२०१७’ अहवालात असे दिसून आले आहे की, हवामान बदलामुळे मागील २० वर्षांत आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे भारताला ७९.५ अब्ज डॉलरचे, म्हणजेच ५.८ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानाला बळी पडावे लागले आहे. सोबतच, जागतिक अर्थव्यवस्थेचे २९०८ अब्ज डॉलरचे थेट नुकसान झाले आहे.

अहवालानुसार, १९९८ ते २०१७ दरम्यान हवामान बदल आणि त्यांमुळे आलेल्या नैसर्गिक घटनांमुळे प्रत्यक्ष होणाऱ्या नुकसानीत १५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील दोन दशकात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत, जागतिक स्तरावर झालेले हे नुकसान दुप्पट असल्याचे अहवालातून सिद्ध झाले आहे.

 

● अहवालातील ठळक मुद्दे:

१) हा अहवाल काल बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघतर्फे ‘आर्थिक नुकसान, गरिबी आणि आपत्ती: १९९८-२०१७’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आला आहे.

२) हवामान बदलांमुळे नैसर्गिक आपत्तींची आशंका बळावत असल्याचे यातून स्पष्ट करण्यात आले आहे.

३) एकूण आर्थिक नुकसानीच्या ७७ टक्के आर्थिक नुकसान हे नैसर्गिक आपत्तींमुळे झाले आहे.

४) जागतिक पातळीवर सुमारे २२४५ अब्ज डॉलर इतके नुकसान १९९७ ते २०१७च्या दरम्यान झाले आहे. त्याचप्रमाणे १९७८ ते १९९७ दरम्यान ८९५ अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान झाले होते.

५) पूर, वादळ आणि भुकंपामुळे होणारे जादा आर्थिक नुकसानीत फ्रान्स, इटली आणि जर्मनी हे तीन यूरोपीय देश आघाडीवर आहेत.

 

● नैसर्गिक आपत्तींमुळे देशनिहाय झालेले आर्थिक नुकसान:

देश

आर्थिक नुकसान (अब्ज डॉलर मध्ये)

भारत

७९.५

चीन

४९२.२

अमेरिका

९४४.८

जपान

३७६.३

फ्रान्स

४८.३

जर्मनी

५७.९

इटली

५६.६

©marathibrain.com 

● ‘आर्थिक नुकसान, गरिबी आणि आपत्ती: १९९८-२०१७’ अहवाल :

— संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

–हवामान बदलामुळे होणारे महत्वपूर्ण बदल आणि मौसमी घटनांचे जागतिक अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या प्रभावाचे यात मूल्यांकन केले आहे.

 

स्रोत: UN News

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: