Site icon MarathiBrain.in

पंतप्रधान मोदींना यंदाचा ‘सेऊल शांतता पुरस्कार’ जाहीर

वृत्तसंस्था एएनआय,

नवी दिल्ली, २४ ऑक्टोबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर्षीच्या ‘सेऊल शांतता पुरस्कारा’ने सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार त्यांना आर्थिक दृष्टीतून जागतिक शांततेत योगदान दिल्याबद्दल दिला जाणार आहे.

२०१८ सालचा ‘सेऊल शांतता पुरस्कार’ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार मोदींना मिळणार आहे. देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील आर्थिक आणि सामाजिक दरी कमी करण्यासाठी ‘मोदीनॉमिक्स’ या संकल्पनेचे श्रेय म्हणून हा पुरस्कार दिला जात असल्याचे पुरस्कार समितीने म्हटले आहे. मोदी या प्रतिष्ठीत पुरस्काराचे १४वे मानकरी ठरणार आहेत. 

‘भ्रष्टाचार उन्मुलन आणि सामाजिक एकात्मता यांच्यातून लोकशाही मजबूत करणे, भारतीय मानव विकास आणि जागतिक अर्थव्यवस्थेला गती प्राप्त करून देण्यात योगदान केल्याबद्दल मोदींचा सत्कार करण्यात येणार आहे. आंतरिक सहकार्य आणि भारतीय अर्थव्यवस्थेला सुस्थितीत आणण्यासाठी मोदींच्या समर्पणाची नोंद म्हणून, सेऊल पुरस्कार समितीने यावर्षीचा पुरस्कार नरेंद्र मोदींना देण्याचे ठरवले आहे’, असे विदेश मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आहे.

भारताचे कोरिया गणराज्यसोबत वाढत चाललेल्या घनिष्ठ संबंधांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आभार मानून हा पुरस्कार स्वीकार केला आहे.  हा पुरस्कार सेऊल शांती पुरस्कार संस्थेतर्फे परस्पर नियोजित वेळी प्रदान केला जाणार आहे.

सेऊल शांतता पुरस्कार :

२४ वे ऑलम्पिक खेळ सेऊलमध्ये यशस्वीरीत्या पार पडल्याचा पार्श्वभूमीवर या पुरस्काराची सुरुवात सन १९९० मध्ये झाली. जागतिक ऑलम्पिक समितीचे माजी अध्यक्ष जुआन अँटोनियो समारंच हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले होते. हा पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या श्रेणीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव कोफी अन्नान, जर्मनीच्या कुलपती एंजेला मर्केल इत्यादींचा समावेश आहे.

◆◆◆ 

Exit mobile version