पुण्यात कालवाफुटीमुळे अजूनही वाहतूककोंडी

पुणे, २७ सप्टेंबर

शहरातीच्या जनता वसाहत परिसरातील मुठा कालव्याचा डावा भाग फुटल्याने शहरात आज दुपारपासूनच वाहतूक ठप्प होत गेली आहे, ती अजूनही ओसरलेली नाही. शहराच्या मध्यभागी असलेल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आहे.

आज दुपारी बारानंतर तानाजी मालुसरे पथ (सिंहगड रस्ता) जलमय झाल्याने वाहतुक ठप्प होत गेली आणि अवघ्या तासाभरातच निम्मे शहर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीत अडकले. वाहतुक पोलिसांनी ठिकठिकाणी या रस्त्यावरील वाहतुक बंद करुन पर्यायी रस्त्याने वळविली. परिणामी लाखो वाहने मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर आल्याने वाहतुक कोंडीमध्ये भर पडली आहे.

आज दुपारी साडे अकरा-बारा वाजण्याच्या सुमारास मुठा डावा कालवा फुटला. त्यानंतर पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह रस्त्याच्या दिशेने झेपावला व त्यानंतर आगळे मुख्य वाहतुकीचे रस्ते जलमग्न झाले. या घटनेची माहिती मिळताच वाहतुक पोलिसांनी तत्काळ ठिकठिकाणी बॅरीकडेस्‌ टाकून रस्ते बंद करण्यास सुरवात केली. त्यामध्ये सारसबागजवळील सावरकर चौक पहिल्यांदा बंद करण्यात आला. त्यापाठोपाठ नीलायम पुलाजवळून सिंहगड रस्त्याला वळणारी वाहतुक थांबविण्यात आली. पुढे आदमबागेजवळून लाल बहादूर शास्त्री रस्त्याकडे जाणारा रस्ता, पुरम चौकातुन टिळक रस्त्यावर जाणारी वाहतुक बंद करण्यात आली. लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलिस चौकीकडून दांडेकर पुलाच्या दिशेने जाणारा रस्ता बंद करण्यात आला. सिंहगड रस्ता व राजाराम पुलाकडून दांडेकर पुलाच्या दिशेने येणारी वाहतुक गणेश मळा, साथी किशोर पवार चौक येथून दत्तवाडीतून म्हात्रे पुल, नवी पेठेकडे वळविण्यात आली.

 

मुख्य रस्त्यांवरील वाहतुक वळविण्यात आल्याने दांडेकर पुल, सारसबाग, निलायम रस्ता, दत्तवाडी, टिळक रस्ता, नळ स्टॉप, पर्वती, आनंदनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली. वाहतुक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रस्ते बंद केलेल्या ठिकाणी थांबून वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. स.प.महाविद्यालयाकडून फडके चौक आणि तेथून पर्वतीकडे जाणारा रस्ता, सेनादत्त पोलिस चौकीकडून म्हात्रे पुल मार्गे नळस्टॉपकडे जाणारा रस्ता खुला असल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला. मात्र एसटी, पीएमपीएल बस, खासगी बस, ट्रक, टेम्पो, ट्रॅव्हल्स यांसारख्या मोठ्या वाहनचालकांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागला आहे.

ही वाहतूक अजून सुरळीत झालेली नाही. कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने तिथे नेहमीच वाहतुकीची कोंडी असते, मात्र कालवा फुटीमुळे काही वाहतूक तिकडे वळवण्यात आल्याने वाहतुकीची अजून कोंडी झाली आहे.

दरम्यान, कालव्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत २४ तास लागणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिल्याचे कळले आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: