महाराष्ट्र व कर्नाटकच्या पूरग्रस्त भागांत भारतीय लष्कराचेही बचावकार्य वेगात
ब्रेनवृत्त | ७ ऑगस्ट
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील बहुतांश भागात संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित पूरग्रस्त भागात जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून, बचाव कार्याचे काम सुरू आहे. दोन्ही राज्याच्या पूरग्रस्त भागांत एनडीआरएफ, स्थानिक लोकांसोबतच भारतीय लष्करातर्फे वेगाने मदत व बचावकार्य सुरू आहे.
स्रोत : पत्र सूचना कार्यालय
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पावसाची संततधार आणि ठराविक काळाने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. काही मोठ्या जलाशयांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे देखील पाणीपातळीत वाढ झाली आहे. या दोन्ही राज्यात भारतीय लष्कराकडून पूरग्रस्त भागामधे वेगाने मदत आणि बचावकार्य करत आहे. सुमारे 1000 जवानांचा समावेश असलेल्या 16 तुकड्या आणि 12 अभियंता कृतीदलं महाराष्ट्रात रायगड, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त ठिकाणी, तर कर्नाटकमध्ये बेळगांव, बागलकोट आणि रायचूर जिल्ह्यात पाठवण्यात आल्या आहेत.
भारतीय लष्कराच्या मदतीने आतापर्यंत 500 लोकांची पूरातून सुटका करण्यात आली असून ठिकठिकाणी वैद्यकीय मदत आणि अन्नाची पाकिटं वितरित करण्यात येत आहेत. सोबतच स्थानिक स्वयंसेवी संघटना व नागरिकांच्या मदतीने मदतीचे कार्य सुरू आहे. दरम्यान, रायगड, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी 1200 ते 1300 पेक्षा जास्त लोक अजूनही अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ आणि नागरी प्रशासनासह लष्कराचे मदतकार्य सुरुच आहे.
◆◆◆