राज्य शासनाची एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट!

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यशासनाने एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना भेट म्हणून महागाई भत्ता  देण्याचा व वेतनवाढीचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांना  ₹२५०० तर अधिकाऱ्यांना  ₹५००० दिवाळी भेट म्हणून मिळणार आहेत.

 

मुंबई, २२ ऑक्टोबर

एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना १० टक्के इतकी अंतरिम वेतन वाढ देण्याचा, तसेच एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.  श्री. रावते म्हणाले की, ‘एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अनुक्रमे २५०० आणि ५००० रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकारी -कर्मचाऱ्यांना ही दिवाळी भेट तातडीने देण्यात यावी, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.’

 

● एसटी अधिकाऱ्यांना १० टक्के अंतरिम वेतनवाढ

एसटी अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरिम वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला केला. ही वेतनवाढ ऑक्टोबर २०१८ पासून लागू होणार आहे. संबंधित वेतनवाढबाबत अभ्यास करुन महामंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्यांची दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन महिन्यात अहवाल सादर करण्याबाबत या समितीस सूचित केले गेले असून, त्यानंतर अधिकाऱ्यांना अंतिम वेतनवाढ दिली जाईल. तत्पूर्वी,या समितीचा अहवाल येईपर्यंत अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरिम वाढ करण्यात येत आहे.

● एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ

एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्येही वाढ करण्याचा निर्णयही जाहीर केला गेला आहे. त्यानुसार राज्य शासनाने एसटी अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के इतकी वाढ करण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०१८ च्या वेतनापासून हा महागाई भत्ता देण्यात येईल. वेतनवाढीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आधीच सुधारित झाले आहे. त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र शासनाप्रमाणे २ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पगारवाढीतील मागील थकबाकीतील ५ हप्त्यांची रक्कमही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ नोव्हेंबर रोजी देण्यात यावी, असे आदेशही महामंडळाला देण्यात आले असल्याचे रावते यांनी सांगितले.

 

( संदर्भ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय)

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: