मराठी चित्रपटाचा इतिहास बदलवणारा कलाकार म्हणून दादा कोंडकेंकडे बघावे लागेल. कारण, पारंपरिक पठडीतून वेगळय़ा टोकाला नेणारे चित्रपट दादांनी निर्माण केले. पण, तरीही मराठीपण आणि चित्रपट संस्कृतीला कुठेही धक्का लागू दिला नाही. इरसाल पात्र, दमदार कथानक, धमाल विनोद, ठेकेबाज गाणी आणि सद्य परिस्थितीवर चिमटे काढणारे संवाद ही त्यांच्या चित्रपटांची जमेची अर्थात यशाची बाजू होती. म्हणूनच दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.
व्हाईट कॉलर्ड वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण, पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले, त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी झाली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारकेशी पडद्यावर नको तितकी घसट हे त्यांचे वैशिष्टय़ होते. या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके आणि वादंग ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली. त्याचा पॉझिटिव्ह फायदा घेण्याचे कसब दादांमध्ये होते.
पिटातल्या प्रेक्षकांना या कशाशी काही देणे-घेणे नव्हते. दादांचा प्रेक्षकवर्ग ठरलेला असे. टीव्ही किंवा दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात, दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी ट्रांझिस्टर कानाशी घेणा-या किंवा पिटात शिट्टय़ा वाजवत गंगूच्या तंगडय़ांची चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटांचा मायबाप होता. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे, नुकताच त्यांचा जन्मदिवस होऊन गेला.
८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नाव कृष्णा कोंडके होते. नायगाव – मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या या कृष्णाने नावाचे सार्थक मराठी चित्रपटसृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बँड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाटय़, नाटके यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले.
कलेची सेवा बँड पथकाच्या मार्फत करणा-या दादांनी मग सेवा दलात प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी ‘दादा कोंडके आणि पार्टी’ नावाचे एक कलापथकही काढले. प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते याच संदभार्तून जोडले गेले. स्वत:ची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या खणखणपूरचा राजा या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या विच्छा माझी पुरी करा या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. १५००च्या वर प्रयोग झालेल्या या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. विशेष म्हणजे आशा भोसले या विच्छा.. चा मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार म्हणजे फटकेच असत. नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे डोक्यावर घ्यायचे.
१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या सोंगाडय़ा -(१९७१)ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. सोंगाडय़ा ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णीनी केले होते. बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरलेल्या या चित्रपटानंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वत:च्या कामाक्षी प्रॉडक्शन या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणा-या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट निर्माण केला. एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोटं लावीन तेथे गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका, पळवा पळवी, येऊ का घरात, सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शनने प्रकाशित केले. १९८१ साली गनिमी कावा त्यांनी भालजींच्या बॅनर खाली केला.
कामाक्षी प्रॉडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली. त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर – पार्श्वगायनासाठी, तर बाळ मोहिते प्रमुख दिग्दर्शन सहाय्यक ठरलेले असत. लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवडय़ांचे गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड त्यांनी केले. हिंदीतून – तेरे मेरे बीच में, अंधेरी रात में दिया तेरे हात में, खोल दे मेरी जुबान, आगे की सोच, हे चित्रपट त्यांनी केले. १९७७ साली पांडू हवालदार या मराठी चित्रपटाच्या धर्तीवर चंदू जमादार हा गुजराती चित्रपट त्यांनी केला. ताडदेवच्या कामाक्षीच्या कार्यालयात त्यांना भेटायला त्यांचे चाहते महाराष्ट्रातल्या कानाकोप-यांतून यायचे व दादांनी त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही. चाहत्यांबरोबर फोटो सेशन हा त्यांचा वेगळा दैनिक कार्यक्रम असे. दादांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवातही वादग्रस्तच झाली.
कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या सोंगाडय़ाच्या आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा तीन देवियाँ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. दादांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले. मग काय विचारता. शिवसैनिकांनी कोहिनूर बाहेर राडा घातला! कोहिनूरच्या मालकांना तत्कालीन सेनेचा दणका मिळताच, सोंगाडय़ा प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले. हा सोंगाडय़ा सुपर डुपर हिट्ट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली. त्यामुळे १९७२ साली एकटा जीव सदाशिव प्रदर्शित झाला. या चित्रपटाची धास्ती इतकी होती की, खुद्द राज कपूरने आपल्या मुलाला ऋषी कपूरला लाँच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली. दादांमुळे बॉबी पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना एकटा जीव सदाशिव उतरवण्याची विनंती करायला लागली होती. तिथून पुढे मग दादांनी मागे वळून पाहिलेच नाही. एकापाठोपाठ सुपरहिट चित्रपट देणारा हा नायक, निर्माता मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास बनला.
सौजन्य: दैनिक प्रहार