‘शिक्षणाची दैनावस्था – भाग ४’

‘शाळा-महाविद्यालयांमध्ये नियमित शिक्षकांची भरती केल्याने सरकारी तिजोरीवर भार पडत असल्याचे कारण सांगून तुटपुंज्या मानधनावर प्राध्यापकांची नियुक्ती केली जाऊ लागली. मात्र, भविष्यात आपण नियमित शिक्षक म्हणून रुजू होऊ, अशी आशा बाळगून असलेले हे वर्गणी व्याख्यातेही (Contributory Lecturers) शेवटी बेरोजगारच राहिले.’

 

 

● तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे जग

   जवळपास सन २०००च्या सुमारास ‘वर्गणी व्याख्याता’ (Contributory Lecturer)  किंवा  ‘CHB Lecturer’ हा शब्द वरीष्ठ महाविद्यालयांत बऱ्यापैकी रूढ झाला. सरकारी तिजोरीवर आर्थिक ओझे पडत असल्याचे कारण पुढे करून, नियमित प्राध्यापकांचे पद न भरता तुटपुंज्या मानधनावर सीएचबी प्राध्यापक नियुक्त केल्या जाऊ लागले. नुकतेच पदव्युत्तर झालेले उमेदवार भविष्यात आपल्याला नियमित प्राध्यापकाची संधी मिळेल, अशी आशा बाळगून काम करू लागले. वयाने जवळपास बरोबरीचे असलेले विद्यार्थी ‘सर किंवा मॅडम’ म्हणू लागले की सीएचबी प्राध्यापकाची छाती फुगून जायची. आपण प्राध्यापक आहोत याचा गर्व असायचा.

   नेट/सेट च्या परीक्षेचा कचरा होण्याआधी फक्त पदव्युत्तर झालेल्या उमेदवारांना सीएचबी प्राध्यापक म्हणून संधी मिळायची. सुरुवातीचे दोन-तीन वर्षे असा प्राध्यापक हवेत उडायचा. आपल्याला मानधन किती मिळते, याची पर्वा न करता आपण जणू काही तोफ आहोत अशीही भावना काही सीएचबी प्राध्यापकाच्या मनात त्यावेळी यायची. मात्र तीन चे चार वर्षांनंतर अशा प्राध्यापकांच्या सन्मानाला ठेच पोहोचायची. कारण त्यावेळी लग्नाच्या बाजारात अशा प्राध्यापकांना मागणी शून्य असायची. आपण सीएचबी प्राध्यापकीमुळे आपले भर तारूण्य खराब केले, असे त्यांना नंतर उमजू लागले.  हे ज्याला उमजले तो यातून सावरला व अशांनी सीएचबी प्राध्यापक पद कायमचे सोडले. मात्र काहींनी सतत १५ ते २० वर्षे फक्त सीएचबी प्राध्यापक पदावरच काम केल्याचीही अनेक उदाहरणे देता येतील.

         ‘शिक्षणाची दैनावस्था – भाग १’

   पूर्वी सीएचबी प्राध्यापकाला प्रति तासिका ७५ रूपये असे मानधन दिले जात होते. एका आठवड्यात सात तासिका अशी मर्यादा असल्याने, नियुक्ती ९ महिन्यांसाठी, तर प्रत्यक्ष काम ७ महिने व त्यातही मानधन वर्षाच्या शेवटी, असे स्वरूप या मानधनावर आधारित प्राध्यापकीचे होते. अशा प्राध्यापकांचे वर्षाचे आर्थिक उत्पन्न २०,००० ते २५,००० रूपये इतके असायचे.

   सध्याच्या परिस्थितीतही तसा फारसा फरक पडलेला नाही. सध्याच्या घडीला परंपरागत कोर्सच्या अभ्यासक्रमाला ₹२४०, तंत्रनिकेतन महाविद्यालयात ₹५००, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयात ₹८०० प्रति तासिका असे दर आहेत. सर्वाधिक सीएचबी प्राध्यापक परंपरागत अभ्यासक्रम चालविणाऱ्या  महाविद्यालयांमध्ये आहेत. सध्याचे बहुसंख्य सीएचबी प्राध्यापक नेट, सेट, एम. फील अथवा पी. एच. डी. झालेले आहेत. यांचा वर्षाचा पगार ₹४०,००० ते ५०,००० इतका निघतो. इतके उच्चशिक्षित असून वर्षाला भर तारुण्यात सीएचबी प्राध्यापक ४०,००० ते ५०,००० रुपये कमावतो. याउलट, वयाने त्यापेक्षा कमी असलेला, शिक्षण सुटलेला, पानटपरी चालविणारा किंवा तत्सम कोणतेही काम करणारा, यापेक्षा जास्त कमाई करतो. एका बाजूला सीएचबी प्राध्यापकाच्या आजूबाजूला वास्तव्यास असणारा, दहावी, बारावीनंतर डी. एड. करून मास्तर झालेला व्यक्ती बंगला बांधतो, तर दुसऱ्या बाजूला अतिशय उच्च शिक्षण घेणारा आर्थिक अडचणींमुळे नेहमीच कर्जबाजारी असतो. त्याचे खायचेही वांदे असतात.

       ‘शिक्षणाची दैनावस्था – भाग २’

   विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशींनुसार प्रत्येक महाविद्यालयात ८०% प्राध्यापक नियमित तर २०% प्राध्यापक तात्पुरत्या स्वरुपाचे (अर्थातच सीएचबी सारखे) असणे आवश्यक आहे. मात्र सध्या उलटे चित्र पाहायला मिळते. बहुतांश महाविद्यालयांत किंवा विद्यापीठातील कित्येक पदव्युत्तर विभागात एकच नियमित प्राध्यापक व इतर सर्व सीएचबी प्राध्यापक पाहायला मिळतात. अशा महाविद्यालयातील शिक्षणाच्या दर्जाबाबत न बोललेलेच बरे. जगातील टॉप रँकच्या विद्यापीठांत महाराष्ट्रातील एकही विद्यापीठाचे नाव नसणे व त्याबाबत काही लाजही न वाटणे, ही शोकांतिकाच आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र स्रोत

   आज अनेक महाविद्यालयांत नियमित असणारे कित्येक प्राध्यापक दर्जाहीन असतात. हे नियमित प्राध्यापक आपला ‘एपीआय’ (Academic Performance Indicator) स्कोअर कसा वाढेल, यावर लक्ष केंद्रीत करतात. याऊलट आजचा सीएचबी प्राध्यापक दर्जेदार असतो. अनुदानित महाविद्यालयात संस्थापक सीएचबी प्राध्यापकांना गोड लाडू दाखवून कामाला जुंपत असतात. एका तासाऐवजी कित्येकांना पाच-पाच तास राबविले जाते. नॅकची (NAAC) सगळी कामे त्यांच्याकडून करवून घेतली जातात. कॉलेजच्या चुकीमुळे वर्षाच्या शेवटी मिळणारे मानधन दोन दोन वर्षे रडखून राहिल्याचेही उदाहरणे आहेत. तरीही, कॉलेजची रिक्त जागा भरतेवेळी आपला विचार केला जाईल, अशी आशा बाळगून सीएचबी प्राध्यापक निमूटपणे आपले काम करत असतात. पण प्रत्यक्षात जागा निघाल्यावर संस्थापक बेईमान निघाल्याचेही उदाहरणे देता येतील.

   ‘उच्च शिक्षणाची दैनावस्था : भाग ३’

   कित्येक महाविद्यालयांत सीएचबी प्राध्यापक प्रत्यक्षात नियमित प्राध्यापकाइतकेच काम करतो. नियमित प्राध्यापक प्रत्येक महिन्याला लाखात पगार उचलतो, तर तितकेच काम करणारा सिएचबी प्राध्यापक वर्षाचे मिळून धड अर्धा लाखही उचलत नाही. यातून सीएचबी प्राध्यापकाच्या मनात न्यूनगंडाची भावना निर्माण होत जाते. मात्र मनातल्या मनात व्यवस्थेला शिव्या-शाप देण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही उपाय नसतो.

 

लेखक: रूपेशकुमार राऊत

मुख्याध्यापक, पूर्ती पब्लिक स्कुल, सालेकसा, जि. गोंदिया.

सहाय्यक नियोजन अधिकारी ( एमपीएससी )
एमएससी व सेट ( भौतिकशास्त्र), एम. एड., नेट (एज्युकेशन).
इमेल: rupesh.raut7@gmail.com
संपर्क: 9130393162

◆◆◆

 

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: