‘शिक्षणाची दैनावस्था : भाग ६’
महाविद्यालयीन शिक्षक भरतीचा मुद्दाही प्राथमिक शाळांतील शिक्षक भरती सारखाच गंभीर आहे. आज महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ‘नेट/सेट’ परीक्षेची पद्धत आहे. नोकरीच्या आशेने पदव्युत्तरच काय, तर पी.एच.डी. धारकांनाही मोठ्या आशेने परीक्षा दिल्या. मात्र फक्त परीक्षा आणि निकाल आलेत, मात्र शिक्षकांची अपेक्षित भरतीच झालेली नाही.
● नेट/ सेट/ पी. एच डी. धारकांची बेरोजगारी
वरीष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची साडेतीन हजार पदे भरली जाणार असल्याची बातमी नुकतीच वाचण्यात आली. मागील वर्षी जाहीर केलेल्या पदभरती बंदीमुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने केली. सततच्या वाढत्या दबावामुळे सरकारने ही घोषणा केली. ही केवळ घोषणाच ठरू नये, अशी अपेक्षा करूया. कारण याआधी शिक्षक भरतीच्या घोषणा बऱ्याचदा झालेल्या आहेत, पण त्यांची अंमलबजावणी मात्र झाली नाही .
सध्याच्या घोषणेनुषार साडेतीन हजार जागा भरण्यात येणार असल्या, तरी ह्या साडेतीन हजार जागांपैकी फक्त काही जागाच शिक्षकांच्या असणार आहेत. २०११ पर्यंत नेट/सेट उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित होती. परंतु २०१२ पासून नेट/सेट च्या चुकीच्या परीक्षा पद्धतीमुळे नेट/ सेट उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. ही संख्या झपाट्याने वाढण्याचा परिणाम म्हणून की काय, पण ‘सेट’च्या अधिकृत संकेतस्थळावर २०१२ पासून उत्तीर्ण होणाऱ्यांची आकडेवारीच उपलब्ध नाही. २०११ पर्यंत एरवी महाराष्ट्रात सेट / नेटच्या परीक्षेत ५०० विद्यार्थीही उत्तीर्ण होत नव्हते. आजघडीला एका वर्षात समजा सेटची परीक्षा दोनदा आयोजित झाली, तर उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या अंदाजे दहा हजाराच्या वर असेल. त्यात दोन नेटच्या परीक्षेचा निकाल मिळविला, तर महाराष्ट्रात अंदाजे १२,००० उमेदवार दरवर्षी प्राध्यापक पदासाठी लायक ठरतात! नेट/सेट व्यतिरिक्त पी. एच डी. ही सुद्धा प्राध्यापक पदासाठी पात्रता असल्याने दरवर्षीचा पात्र उमेदवारांचा आकडा आणखी फुगतो.
नेट / सेट / पी. एच डी. धारकांमधील बेरोजगारीची दाहकता इतकी आहे, की दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका केंद्रीय विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विषयातील अनुसूचित जातीच्या राखीव सहायक प्राध्यापक पदासाठी एकूण ७२ पात्र उमेदवार रिंगणात होते. यांपैकी अनेक उमेदवार दोन ते तीन विषयात नेट होते. काही उमेदवार लेखक सुद्धा होते. काही उमेदवारांचा एपीआय (Academic Performance Indicator) २००च्या घरात होता. मी स्वतः तीन विषयात नेट व एका विषयात सेट उत्तीर्ण आहे, पण दुर्दैवाने मी सहायक प्राध्यापक नाही.
२०११ पर्यंत पात्र उमेदवार कमी उपलब्ध असल्यामुळे बहुसंख्य अनुदानित महाविद्यालयात प्राध्यापकांच्या जागा भरण्याचे ‘रेट‘ अत्यंत कमी होते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या भिकारी असणाऱ्या संस्थाचालकांची कमाई होत नसे. त्यामुळे आपले राजकीय वजन वापरून मुळावरच घाव घालून पात्र उमेदवार जास्तीत जास्त संख्येने कसे उपलब्ध होतील, याचा विचार करून तशी व्यवस्था निर्माण करण्यात आली.
स्रोत: दै. सकाळ, २४ मार्च २०१८.
२०१२ पासून पात्र उमेदवार जास्त संख्येने उपलब्ध झाल्यामुळे प्राध्यापक पदाचे ‘रेट‘ वीस लाखापासून ते चाळीस लाखापर्यंत वाढले. महाराष्ट्रातील बहुसंख्य अनुदानित महाविद्यालयात प्राध्यापक पदाची प्रत्यक्ष जाहिरात प्रसिद्ध होण्याआधीच उमेदवार ‘फिक्स’ असतो. समजा ‘फिक्स’ नसला तरी, मुलाखतीच्या दिवशी जास्तीत जास्त ‘भीक’ देणाऱ्याची निवड केली जाते. काही नामवंत संस्थामध्ये आधी लेन-देनचे व्यवहार होत नव्हते, पण सध्या अशा संस्था शोधूनही सापडत नाही.
महाराष्ट्रात सहायक प्राध्यापकाचे पद भरण्यासाठी ‘डोनेशन‘ घेणे चालतच आले आहे. यावर कायमचा तोडगा काढणे आवश्यक आहे. यासाठी सरकारने सर्व अनुदानित महाविद्यालये आपल्या ताब्यात घेणे आवश्यक आहे. हे शक्य नसेल तर निदान अनुदानित महाविद्यालयातील सर्व जागा ‘एमपीएससी’मार्फत भरण्याची सोय करावी. पगार सरकारने द्यावे व जागा संस्थाचालकांनी भरावे ही पद्धत भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी आहे.
तथाकथित शिक्षणतज्ज्ञांनी प्राध्यापक पदाच्या पात्रतेचा फेरविचार करावा. नेट/सेट ही एकच पात्रता ठेवावी, याशिवाय नेट/सेट च्या परीक्षेचे स्वरूप बदलावे. ती आधीसारखीच ठेवावी. ‘ऋणात्मक गुणपद्धतीचा’ अवलंब करावा. हे जर आताच केले नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रमाणे नेट/सेट धारकांच्या आत्महत्येचे सत्र महाराष्ट्रात सुरू होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.
लेख : रूपेशकुमार राऊत
मुख्याध्यापक, पूर्ती पब्लिक स्कुल, सालेकसा, जि. गोंदिया.
सहाय्यक नियोजन अधिकारी ( एमपीएससी )
एमएससी व सेट ( भौतिकशास्त्र), एम. एड., नेट (एज्युकेशन).
इमेल: rupesh.raut7@gmail.com
संपर्क: 9130393162
◆◆◆
विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.