मध्यप्रदेश पोटनिवडणुकीतील २३% उमेदवार कोट्यधीश !

मध्यप्रदेशात होणाऱ्या आगामी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण ३५५ उमेदवारांपैकी २३ टक्के उमेदवार कोट्यधीश व १८ टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती एका सर्वेक्षणाच्या सांख्यिकीतून समोर आली आहे. 

 

ब्रेनविश्लेषण | मध्यप्रदेश पोटनिवडणूक

मध्यप्रदेशात होणाऱ्या आगामी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण ३५५ उमेदवारांपैकी २३ टक्के उमेदवार कोट्यधीश (करोडपती) असल्याची माहिती एका सर्वेक्षणाच्या सांख्यिकीतून समोर आली आहे. या कोट्याधीश उमेदवारांपैकी सर्वाधिक उमेदवार भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील आहेत.

मध्यप्रदेश विधानसभेच्या २८ जागांसाठी नोव्हेंबरच्या सुरुवातीला होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश इलेक्शन वॉच आणि लोकशाही सुधारणा संघटना (ADR : Association for Democratic Reforms) या संस्थांनी केलेल्या पाहणीची सांख्यिकी जाहीर केली आहे. या सर्वेक्षणातील अहवालानुसार, मध्यप्रदेश विधानसभेच्या जागांसाठी उभे असलेल्या एकूण ३५५ उमेदरवारांपैकी सुमारे २३ टक्के, म्हणजेच ८० उमेदवार कोट्यधीश आहेत. यांपैकी सर्वाधिक कोट्यधीश भाजप व काँग्रेस पक्षातील आहेत.

या सर्वेक्षणासाठी मोठ्या पक्षांमध्ये भाजपच्या २८, काँग्रेसच्या २८, बहुजन समाज पक्षाच्या २८, समाजवादी पक्षाच्या १४ उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. तसेच, १७८ अपक्ष/स्वतंत्र उमेदरवारांची माहिती तपासण्यात आली. यांपैकी, भाजपच्या २३ (८२%), काँग्रेसच्या २२ (७९%), बसपच्या १३ (४६%), सपच्या २ (१४%) उमेदवारांनी त्यांची संपत्ती कोटींच्यावर असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, स्वतंत्ररित्या उभे असलेले १४ (८%) उमेदवार हे कोट्यधीश आहेत.

दुसरीकडे, ३५५ उमेदवारांपैकी १८ टक्के, म्हणजेच ६८ उमेदवारांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे उमेदवारी अर्जात जाहीर म्हटले आहे. यांपैकी ३९ (११%) उमेदवारांवर गंभीर प्रकारचे फौजदारी गुन्हे दाखल आहेत. गंभीर फौजदारी गुन्हे म्हणजे ५ वर्षांपेक्षा जास्त वर्षांची शिक्षेची तरतूद असलेले अजामीनपात्र गुन्हे. मोठ्या पक्षांपैकी भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी २८ उमेदवारांची माहिती तपासण्यात आली. यांपैकी काँग्रेसच्या १४ (५०%) व भाजपच्या १२ (४३%) उमेदवारांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे.

वाचा | भाजपच्या तिजोरीत सर्वाधिक निवडणूक निधी

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडानंतर खाली झालेल्या २८ विधानसभा जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. एकप्रकारे ही निवडणूक मध्यप्रदेशसाठी ‘मिनी विधानसभा’ म्हणूनच ओळखली जात आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीसह मध्यप्रदेशच्या या निवडणुकीकडेही अनेकांचे लक्ष आहे.

मध्यप्रदेशमधल्या 28 जागांसह देशभरात वेगवेगळ्या राज्यातल्या एकूण 56 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. ह्या निवडणुकांसाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार असूूून, 10 नोव्हेंबरला बिहार विधानसभेच्या सोबतच मतमोजणी होणार आहे.

 

टेलिग्रामवर मोफत सभासद व्हा : @marathibrainin

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: