अभिनेता सुशांत सिंह राजपूत काळाच्या पडद्याआड

ब्रेनवृत्त 

बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र सुशांतच्या नोकराने त्याच्या आत्महत्येविषयी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपासासाठी मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याच्या मॅनेजर असलेल्या दिशाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून तो नैराश्यात असल्याची माहिती मिळाली आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

दरम्यान, ही घटना घडली तेव्हा त्याचे मित्रही घरी होते. सुशांत बराच वेळ त्याच्या खोलीतून बाहेर येत नसल्याने त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडला. तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली. सुशांतसिंह राजपूतने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2008 मध्ये टीव्ही सीरियल ‘किस देश में है मेरा दिल’ पासून केली होती. पण ‘पवित्र रिश्ता’ या मालिकांद्वारे त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. झी टीव्हीवर प्रसिद्ध होणाऱ्या पवित्र रिश्ता मध्ये सुशांत सिंह आणि अंकिता लोखंडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या दोघांचे बरेच दिवस प्रेमसंबंध होते.

त्यानंतर 2013 सालच्या काय पो छे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्याच्या कारकिर्दीला खरा ब्रेक मिळाला तो एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी मध्ये. यात सुशांतने क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीची भूमिका केली होती. त्याचबरोबर शुद्ध देसी रोमान्स, पी.के., डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी अशा सिनेमांमध्ये त्याने लक्षवेधी भूमिका निभावल्या होत्या.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

सुशांत सिंह राजपूतचा जन्म बिहारमधील पाटणामध्ये 21 जानेवारी 1986 रोजी झाला. त्याचं कुटुंब 2000 च्या सुरुवातीला दिल्लीला स्थायिक झालं होतं. त्याचं सुरुवातीचं शिक्षण सेंट कॅरेंस हायस्कूल पाटणामध्ये झालं तर नंतर दिल्लीच्या कुलाची हंसराज माॅडल स्कूलमध्ये तो शिकला. दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमधून त्यानं मॅकेनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: