ग्राहकांमधील वाढती नाराजी लक्षात घेता एअरटेलने ‘फेअर युसेज पॉलिसी’ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एअरटेल प्रीपेड सिमकार्ड धारक ग्राहकांना आजपासून पुन्हा सर्वच मोबाईल नेटवर्कवर अमर्याद कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे.
ब्रेनवृत्त, ७ डिसेंबर
ग्राहकांची वाढती नाराजी लक्षात घेता ‘एअरटेल’ या दूरसंचार कंपनीने काही दिवसांआधीच लागू केलेली ‘न्याय्य वापर धोरण’ (फेअर युसेज पॉलिसी) परत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एअरटेल सिमकार्डधारक ग्राहकांना परत सर्वच मोबाईल नेटवर्कवर अमर्यादीत कॉलिंगचा लाभ घ्यायला मिळणार आहे.
रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया व एअरटेल यांच्यात दुसऱ्या नेटवर्कवर फोन करण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या दरावरून तिहेरी शीतयुद्ध सुरू असण्याच्या बातम्या झळकल्यानंतर जवळपास सर्वच दूरसंचार कंपन्यांनी आपल्या टॅरिफमध्ये बदल केले होते. यात रिलायन्स जिओने आपले टॅरिफ प्लॅन्स वाढवण्याची घोषणा केल्यानंतर अन्य कंपन्यांनीही आपल्या टॅरिफ प्लॅन्समध्ये ४० ते ४५ टक्क्यांपर्यंतची वाढ केली होती. तसेच, या कंपन्यांनी केवळ आपल्या नेटवर्कवर अमर्यादीत (अनलिमिटेड) कॉल देण्याचा निर्णय घेत अन्य मोबाईल नेटवर्कसाठी ‘न्याय्य वापर धोरण’ (फेअर युसेज पॉलिसी) लागू केली होती. मात्र, यामुुुळे ग्राहकांमधील वाढती नाराजी लक्षात घेता एअरटेलने ही पॉलिसी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेलनं आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत काल माहिती दिली. त्यामुळे एअरटेल सिमकार्ड धारक ग्राहकांना पुन्हा एकदा सर्वच मोबाईल नेटवर्कवर अमर्याद कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे.
We heard you! And we are making the change.
From tomorrow, enjoy unlimited calling to any network in India with all our unlimited plans.
No conditions apply. pic.twitter.com/k0CueSx0LV
— airtel India (@airtelindia) December 6, 2019
“आम्ही तुम्हाला ऐकलं आहे आणि आम्ही हे बदल करत आहोत. उद्यापासून (शनिवार) भारतात कोणत्याही मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड प्लॅनचा वापर करणाऱ्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉल करता येतील. यासाठी कोणतीही अट नाही” असे एअरटेलने म्हटले आहे. या बदलाची अंमलबजावणी आजपासूनच होणात असून, एअरटेल नवे अमर्यादीत प्लॅन्सही आगाऊ देयक ग्राहकांसाठी जाहीर केले आहेत.
स्रोत : एअरटेल इंडिया
दूरसंचार कंपन्यांचे ‘तिहेरी शीत युद्ध’ सुरूच
याआधी, व्होडाफोन-आयडिया व रिलायन्स जिओ कंपनीप्रमाणेच एअरटेलने नव्या प्लॅन्सची घोषणा करत अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ‘फेअर युसेज पॉलिसी’ लागू केली होती. तसेच, फेअर युसेज पॉलिसीची मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांकडून ६ पैसे प्रति मिनिट असा दर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हा निर्णय कंपनीने मागे घेतला आहे.
◆◆◆