मुंबई, २६ मे
चित्रपट कारकिर्दीत पहिल्यांदाच एक मोठी ऐतिहासिक भूमिका साकारायला जाणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘पृथ्वीराज चौहान‘ या चित्रपटालाही कोरोनाचा फटका बसला आहे. येथील दहिसर येथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या चित्रपटाचा सेट पाडण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईत मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी हा सेट पाडण्यात येणार आहे.
यशराज प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेला ‘पृथ्वीराज चौहान’ चित्रपटाला टाळेबंदीचा मोठा फटका बसला असून, मान्सूनच्या आगमन आधी दहिसर येथे उभारण्यात आलेल्या चित्रपटाचा सेट पाडला जाणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारतो आहे. यानिमित्ताने अक्षय पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या ऐतिहासिक चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, येत्या मान्सूनच्या व कोरोनाच्या विलख्यामुळे चित्रपटाच चित्रीकरण सद्या रखडले आहे.
एका वृत्तानुसार, चित्रपटाचे जवळपास ७० टक्के चित्रीकरण पूर्ण झाले आहे. दहिसर येथे दोन महिन्यांपूर्वी चित्रपटासाठी इसवीसनाच्या १२ व्या शतकातील वास्तुकला शैलीतील भव्य सेट उभारण्यात आले आहे. त्यानंतर, ओढवलेल्या टाळेबंदीमुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकाने गेले दोन महिने वाट पाहिली. दोन महिन्यांनंतर कदाचित शूटिंगला सुरुवात होईल, या आशेने त्यांनी सेट तसाच ठेवला होता. मात्र, आता कोरोनाचे वाढते थैमान आणि मान्सूनच्या आगमनाने दुहेरी नुकसान रोखण्यासाठी सेट पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करत असून, आतापर्यंत डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित केलेल्या ऐतिहासिक मालिका प्रचंड यशस्वी ठरल्या आहेत. या चित्रपटात विश्वसुंदरी मानुषी छिल्लर ही पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीच्या महाराणी संयुक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे.
◆◆◆