ऑटोरिक्षा चालकांचा संप मागे!

ब्रेनवृत्त | मुंबई

राज्यातील ऑटोरिक्षा चालक-मालकांनी आजपासून नियोजित असलेला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर संप मागे घेण्यात आला असल्याचे ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. ओला, उबर व इतर बेकायदेशीर टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात याव्या यासाठी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनांनी ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचे ठरवले होते.

महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर संप मागे घेण्यात आला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभारी असून, त्यांच्यासोबतच्या बैठकीत आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असे शशांक राव म्हणालेे. ऐन पावसाळ्यात नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाप्रमाणे आज मध्यरात्रीपासून नियोजित संप मागे घेतला आहे, असेही राव म्हणाले.

९ जुलैपासून ऑटोरिक्षा संघटनांचा राज्यव्यापी संप

राज्यातील ओला, उबर यांसारख्या टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात याव्या, या मागणीसह राज्यातील ऑटोरिक्षा चालक-मालक आज ९ जुलैपासून संपावर जाणार होते. ओला व उबर सेवांच्या बंदीसोबतच हकीम समितीच्या शिफारसी शासनाने तात्काळ लागू कराव्यात, हा मुद्दाही या संपाचा केंद्रबिदू असणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांसह ऑटोरिक्षा चालक कृती समितीने ऐन पावसाळ्यात पुकारलेल्या या संपाने प्रवाशांना फटका बसणार होता.

● ऑटोरिक्षा संघटनांच्या मागण्या

– ओला व उबेरसारख्या अवैध सेवांंवर त्वरित बंदी आणावी

– राज्यशासनाने स्थापन केलेले ऑटोरिक्षा चालक-मालक कल्याणकारी  मंडळ परिवहन खात्यात आणावे

– राज्यातील अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील  भरारी पथकाची स्थापना करणे

– हकीम समितीच्या भाडेवाढीच्या शिफारसी लागू करणे

– विम्याचे पैसे विमा कंपनीत न भरता महामंडळात भरण्याची तरतूद करणे व विम्यात होत असलेली वाढ कमी करणे

९ जुलैला पुकारलेल्या संपात राज्यातील एकूण १८ लाख व त्यांपैकी मुंबई व नवी मुंबईतील १ लाख ७५ हजार रिक्षा चालक-मालक संपावर जाणार आहेत. नागपूरसह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, नवी मुंबई व औरंगाबाद येथील ऑटोरिक्षा संघटना या संपात सहभागी होणार असल्याचे ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले होते.

 

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: