सावधान ! अनोळखी व्यक्तीच्या हातात तुमचा पासपोर्ट देऊ नका
ब्रेनवृत्त, २० जून
सावध रहा! तुमचा ‘विदेश प्रवास परवाना’ (Passport) कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका, परवान्याच्या स्कॅन प्रतींना परवलीचा शब्द (Password) देऊन सुरक्षित करा, अशा विविध सूचना महाराष्ट्र सायबर विभागामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. याचे कारण म्हणजे भारतीय पासपोर्टच्या साचाच्या (template) दुरुपयोग करुन लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे, अशा बनावट पासपोर्टपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने सर्व नागरिकांना केले आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय पासपोर्टचा साचा (template) डार्कनेटवर आणि इंटरनेटवर काळ्या बाजारात सहजपणे उपलब्ध आहेत. यावेळी असे फसवे टेम्लेट्स साधारण ९ ते २३ डॉलर या दरात विक्रीस उपलब्ध आहेत. सायबर गुन्हेगार त्यात आवश्यक ते बदल करून त्याचा बनावट पासपोर्ट बनवतात. त्यानंतर त्याचा वापर करून सिमकार्ड विकत घेतात व या सिमकार्डचा वापर ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी आणि अन्य विघातक कृत्यांसाठी वापरली जात आहेत.
(संग्रहित छायाचित्र)
जर कोणत्याही नागरिकाची पासपोर्ट संदर्भात किंवा अन्य कोणत्याही प्रकारे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास त्यांनी लगेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंद करावी, तसेच या गुन्ह्यांची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर पण द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागानी केले आहे.
● फसवणूक टाळण्यासाठी सायबर विभागाच्या महत्त्वाच्या सूचना
– तुमचा विदेश प्रवास परवाना (पासपोर्ट) कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका.
– पासपोर्टच्या स्कॅन प्रतींना सांकेतिक अथवा परवलीचा शब्द (पासवर्ड) देऊन सुरक्षित करा, ज्यामुळे तुमच्याशिवाय अन्य कोणालाही संबंधित फाईल उघडता येणार नाही.
– ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पासपोर्टची प्रत देणार असाल, त्या प्रतीवर निळ्या पेनच्या शाईने सही व त्यादिवशीची तारीख पण नमूद करा.
● पासपोर्ट तपासून घेताना काय कराल ?
– पासपोर्ट तयार झाल्याची तारीख आणि वैधता संपल्याची तारीख यामध्ये १० वर्षाचे अंतर असावे.
– पासपोर्टला ३६ किंवा ६० पाने असावीत. टंकाचा आकार (Font Size) आणि संरेखन (Alignment) एकसारखी असली पाहिजे.
– जर पासपोर्ट ३६ पानी असेल, तर पान क्र. ३ ते ३४ वर भारताची राजमुद्रा म्हणजेच अशोक स्तंभ असलाच पाहिजे.
– पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पासपोर्ट क्रमांक परफोरेटेड स्वरूपात असला पाहिजे.
– जुन्या आणि नव्या पासपोर्टवरील सर्व माहिती एकसारखीच असली पाहिजे. उदा. आई वडिलांचे, पती-पत्नीचे नाव