५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान आयोजित होणार ‘पक्षी आठवडा’

राज्यात दरवर्षी ५ ते १२ नोव्हेंबर या दरम्यान  ‘पक्षी आठवडा’ आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परिणामी, यंदा पहिल्यांदाच राज्यात ‘पक्षी आठवडा’ साजरा होणार.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

पक्षी हा नैसर्गिक अन्नसाखळी व जैविविधतेतील महत्त्वाचा घटक असल्याने पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्यात यावर्षीपासून ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ‘पक्षी आठवडा’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.

जैवविविधतेतील पक्ष्यांचे स्थान आणि महत्त्व लक्षात घेता पक्ष्यांविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्यात ‘पक्षी सप्ताह’ आयोजित करण्यात यावा अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. राज्य वन्यजीव मंडळाच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या १५ व्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या संबंधित निर्देश दिले होते. परिणाम, राज्यात यार्षीपासून ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी आठवडा आयोजित करण्याचे ठरले असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. येत्या नोव्हेंबर महिन्यात पहिलाच ‘पक्षी आठवडा’ आयोजित होईल

वनमंत्री संजय राठोड

वन्यजीव साहित्य निर्मितीत ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते मारुती चितमपल्ली यांचा ५ नोव्हेंबर हा जन्मदिवस असतो, तर पक्षी अभ्यास शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ.सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबरला असते. या दिवसांचे औचित्य साधून हा ‘पक्षी सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

राज्यात पक्षी सप्ताह साजरा करावा व पक्ष्यांबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यातील पक्षीप्रेमी व संघटना अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होत्या. त्यामुळे हा विषय राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत चर्चेला आला होता.

वाचा | राज्यात आढळू लागली दुर्मिळ गिधाडे ; संवर्धनाची गरज कायम

● पक्षी आठवड्याचे स्वरूप 

यंदा पक्षी सप्ताहाचे पहिलेच वर्ष असणार आहे. या सप्ताहामध्ये कोव्हिड-१९ रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या सर्व सुचनांचे अनुपालन करून पक्ष्यांचे महत्त्व, स्थलांतर व अधिवास, संरक्षण, संर्वधन याबाबत जागृती करण्यात येईल. तसेच ऑनलाईन पक्षी छायाचित्र प्रदर्शन, पक्षी छायाचित्र स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात येतील. पक्षी निसर्ग माहिती पत्रके, पुस्तके, भित्तीपत्रके आदि साहित्यही उपलब्ध करुन दिले जाईल. वन विभागाच्या समन्वयाने हा सप्ताह साजरा करण्यात येईल, अशी माहिती राठोड यांनी दिली.

(संदर्भ : महासंवाद ; संपादन व पुनर्लेखन : marathibrain)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: