महाराष्ट्रातील युतीत हवंय भाजपला मोठा वाटा ?
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची निवड निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय निवडणूक समितीची (सेन्ट्रल इलेक्शन कमिटी) बैठक येत्या २९ सप्टेंबरला किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीनंतरच महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना यांच्यातील जागांचा वाटपाचा तिढा सोडवला जाणार असल्याचे निश्चित आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील पक्षाप्रमुखांच्या उपस्थितीत दिल्लीतील मुख्यालयात मागील दोन दिवसांपासून उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शहा व्यस्त होते. या बैठकी दरम्यानच आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू योगेश्वर दत्त, माजी भारतीय हॉकी संघाचे कर्णधार संदीप सिंग आणि शिरोमणी अकाली दलाचे आमदार बालकुमार सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, हरियाणा राज्याच्या पक्षप्रमुखांसह झालेल्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या नातेवाईकांना व कुटुंबियांना तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “नातेवाईक व कुटुंबियांसाठी तिकीटांच्या मागणीसाठी राज्यातील वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचे तीनपेक्षा अधिक अर्ज आमच्याकडे आले आहेत. मात्र, वरिष्ठ मंत्र्यांच्या नातेवाईकांचा क्रमांक सर्वात शेवटी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे”, असे बैठकीत उपस्थित एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले.
‘भाजपा, प्रवेश देणे सुरू आहे!’ ; राज्यभर फलकबाजी
दुसरीकडे, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही. गुरुवारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील विभागनिहाय भाजपची स्थिती कशी आहे, याचा आढावा शहा यांनी फडणवीस यांच्याकडून घेतला.
मध्यप्रदेशातही शिवसेना स्वबळावर लढणार !
“जागा वाटपाचा तिढा दिल्लीतील वरिष्ठांकडून सुटेल, मात्र मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जगावाटपाबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही” असे एक सूत्रांनी द हिंदू ला सांगितले आहे. दरम्यान, काही आकडे इकडे-तिकडे जरी झाले, तरी भाजप मात्र महाराष्ट्रात युतीमध्ये मोठा वाटा घेण्याच्या निर्णयाने वाटचाल करीत आहे हे स्पष्ट झाले आहे.
◆◆◆