कोव्हिड-१९ लसीचा ‘बूस्टर डोस’ सर्वांसाठी आवश्यक नाही?

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


देशातील सर्वच नागरिकांना कोव्हिड-१९ लसीची अतिरिक्त गुटी (बूस्टर डोस) देण्याच्या विचाराला काही तज्ज्ञ डॉक्टरांचा विरोध आहे. या डॉक्टरांच्या मते सुदृढ व्यक्तींना लसीचे अतिरिक्त डोस घेण्याची कदाचित गरज पडणार नाही. विशिष्ट गंभीर वैद्यकीय समस्या असलेल्या काही निवडक लोकांनाच बूस्टर डोस घेण्याची गरज पडू शकते असे शासन दरबारी असलेल्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

संघ आरोग्य मंत्रालायाने सद्या संपूर्ण लक्ष हे सुरु असलेल्या प्राथमिक लसीकरणावर असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतरच काही विशिष्ट लोकांना बूस्टर डोस प्रदान करण्याचा विचार शासन करू शकते असेही संकेत आरोग्य मंत्रालयतील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ब्रेनसाहित्य ।  कोरोनाचं कोडं उलगडलं? 

शासन सर्वांसाठी अतिरिक्त गुटी देण्याच्या विचारात आहे का, याविषयी माहिती देताना आरोग्य मंत्रालयातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “तज्ज्ञांचे नक्कीच यावर संशोधन सुरु आहे आणि जगभरातील शिफारशींचा विचारही केला जात आहे. परंतु सद्या आमचे मुख्य लक्ष्य वर्तमान लसीकरण पूर्ण करणे हे आहे आणि ते सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. जर नंतर बूस्टर डोसचा विचार झालाही, तर ते सर्वांत आधी ज्यांना वैद्यकीयरित्या अति-आवश्यकता असेल, त्यांनाच दिले जाईल.”  

दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) येत्या काळात अतिरिक्त गुटीची (बूस्टर डोस) आवश्यकता पडू शकते का आणि ते कधी कार्यान्वित करता येऊ शकते यावर विचार करत आहे. या अभ्यासात संघटनेसोबत लसीकरणावरील तज्ज्ञाचे धोरणात्मक सल्लागार गट (SAGE) व कोव्हिड-१९ लस कृतीगट सुद्धा कार्यरत आहेत. याअंतर्गत सद्या आपत्कालीन वापर यादीत (EUL) स्थान मिळवलेल्या लसींचे अतिरिक्त डोस देता येऊ शकतील का आणि कशी देता येतील? याविषयी अवलोकन केले जात आहे.

हेही वाचा । शरीरातील रोगप्रतिकार शक्ती अल्फा, बिटाशी लढण्यात असमर्थ!

> प्रतिरक्षा स्मृतीमुळे अतिरिक्त गुटी आवश्यक नसेल?

डॉक्टरांच्या मते, कोव्हिड-१९ ची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकार शक्तीकडे संबंधित विषाणूची स्मृती संचित असते. जर एखादी व्यक्ती पुन्हा कोरोना विषाणू आजाराने (SARS-COV-२) संक्रमित झाली, तर रोगप्रतिकारक पेशी (इम्युन्यू सेल्स) या विषाणूला संचित स्मृतीच्या आधारे ओळखून घेतात आणि त्या रोजनकाला (पॅथोजन) मारून टाकतात. यालाच रोगप्रतिकारात्मक स्मृती (Immunological Memory) म्हणतात. ही स्मृती कोरोना आजार झाल्यानंतर किंवा त्यावरील लसीकरणानंतर व्यक्तीला स्थिर संरक्षणात्मक प्रतिकारशक्ती प्रदान करते.

अनेक अभ्यासांतून असे आढळले आहे, की ही स्थिर संरक्षणात्मक प्रतिकारशक्ती (Durable Protective Immunity) १२ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकते. परंतु, यामुळे सर्वच व्यक्तींना विषाणूची पूर्णबाधा होत नाही असे नाही. काहींना पुन्हा कोरोना विषाणूची लागण होऊ शकते, पण त्याची तीव्रता आणि रुग्णालयात दाखल व्हावा लागण्याचा दर कमी असतो. 

(बातमीलेखन व संपादन :  सागर बिसेन )

 

आमच्या टेलिग्राम वाहिनीत नक्की सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: