कोरोनाच्या काळी, बारावीची ९९ टक्क्यांवर उडी!
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसईने) इयत्ता बारावीचा निकाल आज केला असून, यंदा निकालात मंडळाने चक्क ९९.३७ टक्क्यांवर उडी मारली आहे. कोव्हिड-१९ संक्रमणामुळे बारावीची मंडळाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. यावर्षी विक्रमी निकाल लागल्यामुळे बारावीच्या गुणांवरून पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा असेल.
सीबीएसईचा (Central Board of Secondary Education) बारावीचा निकाल यंदा ९९.३७% इतका लागला असून, मागील वर्षीच्या ८८.७८% च्या तुलनेत ही टक्केवारी जवळपास ११ टक्क्यांनी अधिक आहे. मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा निकलांमध्ये अशी विक्रमी सुधारणा झाली आहे. दरम्यान, यंदाच्या निकालाचे पूर्वीच्या निकलांशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. यंदा मंडळाच्या परीक्षा रद्द करून नव्या मूल्यांकनानुसार सर्व शाळांच्या मदतीने हे निकाल तयार करण्यात आले आहे.
मोठी बातमी : वैद्यकीय व दंत शिक्षणात ओबीसी व ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना आरक्षण जाहीर!
यंदाच्या सीबीएसई बारावीच्या निकालात ५.३% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी (म्हणजेच ७०,००० हून जास्त) ९५% च्या वर गुण मिळवले आहेत. तर दुसऱ्या दीड लाख विद्यार्थ्यांनी ९०% हून अधिक गुण प्राप्त केले आहेत. परिणामी, १२वी गुणांच्या आधारावरून पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये पात्र गुणांची मर्यादाही (कट ऑफ) अत्याधिक असेल.
कोव्हिड-१९च्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या मंडळाच्या परीक्षा (बोर्डाची परीक्षा) रद्द केल्या होत्या. परिणामी, विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी त्यांच्या दहावीच्या बोर्डाचे, अकरावीच्या अंतिम परीक्षेचे व बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विचारात घेण्यात आले. यासाठी मंडळाने सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या मागील तीन वर्षांच्या कामगिरीला समरस ठरेल अशाप्रकारे मूल्यमापन करण्याचे निर्देश दिले होते.
वाचा 👉 जेएनयूच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सर्वकाही!
दुसरीकडे, असामान्य अशा मूल्यांकन प्रणालीच्या कारणावरून माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ०.१% मुलांची गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचाही निर्णय घेतला आहे. तसेच, संबंधित गुणवत्ता प्रमाणपत्रही न देण्याचे ठरवले आहे.
Join @ मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in