१०वी व १२वीच्या सत्रांत परीक्षेविषयी सीबीएसईचा महत्त्वाचा निर्णय!
वृत्तसंस्था । पीटीआय
ब्रेनवृत्त । नवी दिल्ली
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता १०वी व १२वीच्या मंडळाच्या प्रथम सत्रांत (Term-१) परीक्षेविषयी आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दोन्ही वर्गांसाठी प्रथम सत्राची परीक्षा प्रत्यक्ष पद्धतीने (ऑफलाईन) तसेच बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात आयोजित करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे.
मोठी बातमी : वैद्यकीय व दंत शिक्षणात ओबीसी व ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना आरक्षण जाहीर!
सीबीएसईने आज इयत्ता १०वी व १२वीच्या मंडळाच्या प्रथम सत्रांत परीक्षेविषयी प्राथमिक स्वरूपातील माहिती जाहीर केली आहे. तसेच, या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक येत्या १८ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ही परीक्षा प्रत्यक्ष पद्धतीने, म्हणजेच थेट वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बसवून घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे या परीक्षेतील सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बहुपर्यायी पद्धतीचे असेल आणि प्रत्येक पेपरसाठी ९० मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. परीक्षेचे स्वरूप खालीलप्रकारे असेल –
Term-1 board exams for Classes 10, 12 to be conducted offline; date-sheet to be announced on October 18: CBSE
— Press Trust of India (@PTI_News) October 14, 2021
> कशी असेल १०वी व १२वीची सत्रांत परीक्षा?
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार, सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होतील.
- लहान विषयांचे पेपर आधी होतील आणि त्यानंतर मुख्य विषयांचे पेपर होतील.
- प्रत्येक विषयाच्या परीक्षेला ९० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार असून, ती सकाळी ११.३० ला सुरु होईल.
- प्रात्यक्षित (प्रॅक्टिकल) परीक्षा सत्रांत परीक्षा पूर्ण होण्याआधीच घेतल्या जातील.
यंदा मंडळाने शैक्षणिक सत्राला दोन स्वतंत्र सत्रांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. त्यानुसार दोन्ही सत्रांमध्ये अभ्यासक्रम ५०-५०% असे विभागण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षांच्या शेवटी १० वी व १२वीच्या मंडळाच्या परीक्षा आयोजित होण्याच्या शक्यता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाने त्यावेळी म्हटले होते.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in