राज्यांमध्ये परत कडक निर्बंधांची शक्यता?

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये कोव्हिड-१९ बाधित प्रकरणांचा दर १०% पेक्षा जास्त आहे, अशा जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्याच्या सूचना देशाचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कित्येक राज्यांना केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात दैनिक पातळीवर ४०,००० पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद होत आहे, या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.

संघ आरोग्य सचिव राजेश भूषण (संग्रहित छायाचित्र)

आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात जाहीर केलेल्या निवेदनानुसार, कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्याच्या उद्देशाने असे निर्बंध लोकांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध आणणारे, लोकांची होणारी गर्दी व प्रत्यक्ष परस्परसंवादाला प्रतिबंधित करणारे असावेत असे  निर्देश देण्यात आले आहेत. शनिवारी देशात गेल्या २४ तासांच्या आत ४१,६४९ नव्या प्रकरणांची नोंद झाली होती.

वाचा । २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल; याविषयी व्यवस्थित समजून घ्या!

राज्यांना कडक निर्बंधांचे आदेश देण्यापूर्वी भूषण यांनी केरळ, महाराष्ट्र्र, कर्नाटक, तामिळनाडू, मिझोरम, ओडिशा, आसाम, मेघालय, आंध्रप्रदेश आणि मणिपूर राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या राज्यांमधील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी ८०% प्रकरणे गृह अलगीकरणात आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून देशात दरदिवशी ४०,००० हून अधिक प्रकारणांची नोंद होत असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.

बैठकीत उपस्थित असलेले भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले, की काही आठवड्यांपासून देशातील ४६ जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचा संसर्ग दर १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर ५३ जिल्ह्यांमध्ये कोव्हिड-१९ सकारात्मता दर ५ ते १०% इतका आहे. त्यामुळे राज्यांना जिल्हा पातळीवर त्यांचे स्वतंत्र सिरो सर्वेक्षण करण्याचे सुचवण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांआधीच २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये संक्रमण दर अजूनही जास्त आहे, अशा ११ जिल्ह्यांमध्ये कोव्हिड-१९ निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा । जग करतोय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रवेश!

दुसरीकडे, राष्ट्रीय पातळीवरील चौथ्या सिरो सर्वेक्षणातून प्राप्त परिणामांना मागील आठवड्यात जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार असे आढळून आले, की देशातील जवळपास ४० कोटी लोकांमध्ये कोरोनाशी लढण्यास आवश्यक असलेल्या प्रतिपिंडांचा (अँटीबॉडीज) अभाव आहे. हेच लोक जास्त असुरक्षित असून, त्यांचे राहण्याचे ठिकाणही वेगवेगळे आहेत.

सोबतच, डॉ. भार्गव यांनी राज्यांना कोव्हिड-१९ लसीकरणाचा वेग वाढवण्याच्याही सूचना केल्या आहेत. ४५-६० आणो ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगातील जितके लोक दगावले त्याच्या तुलनेत या दोन्ही वयोगटांतील ८०% लोकांचेच लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे.

 


सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा  www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: