चीन तयार करतोय ‘कृत्रिम चंद्र’ !

चिनी शहरांमध्ये पथदिव्यांऐवजी कृत्रिम चंद्रप्रकाशाच्या वापराची चीनची महत्वाकांक्षी योजना जगासमोर उघड झाली आहे. २०२० पर्यंत चीन नवा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार आहे.

 

मराठी ब्रेन | सागर बिसेन

शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१८


तंत्रज्ञानाच्या बळावर अशक्यप्राय गोष्टीही शक्य करू शकणाऱ्या वर्तमान जगात काय काय घडू शकेल, याची कल्पनाही आपल्याला करता येत नाही. याच जिज्ञासू संशोधनाच्या प्रवासात पुन्हा एका आगळ्यावेगळ्या प्रयत्नाची भर पडणार आहे. लवकरच चीन रस्त्यांवरील पथदिव्यांना (स्ट्रीटलाईट) कृत्रिम चंद्राने पुनर्स्थित (रिप्लेस) करणार आहे.

होय! हे खरं आहे. एक महत्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून सुरुवातीला चीनच्या चेंगदू शहरात पथदिव्यांना बदलण्याचा विचार सुरू आहे. दक्षिण-पश्चिम चीनमध्ये कृत्रिम चंद्राच्या प्रकाशाचा वापर पथदिव्याप्रमाणे होणार आहे. यासाठी चीन ‘कृत्रिम चंद्र’ (Artificial Satellite/Moon) तयार करणार असून ते आकाशात प्रक्षेपित करणार आहे. हा कृत्रिम उपग्रह पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्राच्या प्रकाशनाला पूरक ठरणार आहे.

संग्रहित फोटो : स्रोत

रात्रीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या पथदिव्यांचा वापर थांबवून त्यांऐवजी कृत्रिम चंद्राच्या साहाय्याने रस्ते प्रकाशित करण्याच्या महत्वाकांक्षी संकल्पनेला चीन २०२० पर्यंत पूर्णत्वास नेणार आहे. या संबंधीची माहिती चीनच्या ‘द पीपल्स डेली’ने नुकतीच प्रकाशित केली आहे. चेंगदू अंतराळ विज्ञान संशोधन संस्थेतर्फे हे कार्य केले जाणार आहे. चीनच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला ‘कृत्रिम चन्द्र’ असे नाव देण्यात आले आहे. हा चंद्र नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशामध्ये भर पाडणारा ठरणार आहे. आठ पट जास्त प्रकाशमान असलेल्या चंद्राला हा कृत्रिम चंद्र पूरक ठरणार आहे. या उपक्रमाची माहिती संस्थेचे अध्यक्ष वु चुंगफेंग यांनी चेंगदूमध्ये १० ऑक्टोबरला आयोजित एका कार्यक्रमात दिली आहे.

‘कृत्रिम चंद्र’ तयार करण्याचा हा विचार एका फ्रेंच कलाकाराच्या कल्पनेतून समोर आला आहे. या कलाकाराच्या कल्पनेनुसार, जर पृथ्वीच्या सभोवताली असंख्य आरशांनी तयार केलेला कंठभूषण (नेकलेस) किंवा हार बांधला गेला, तर या हारामुळे प्रतिबिंबित (रिफ्लेक्टेड) झालेल्या प्रकाशाने पॅरिस शहराचे रस्ते संपूर्ण वर्षभर प्रकाशित राहू शकतात. याच संकल्पनेचा आधार घेऊन चीन अंतराळ संशोधनाच्या आणि वीज वाचवण्याच्या क्षेत्रात एक अभूतपूर्व पाऊल पुढे टाकणार आहे. वुच्या सांगण्यानुसार, या कृत्रिम चंद्राची प्रकाशन (इलुमीनेशन) चाचणी मागील वर्षापासूनच सुरू करण्यात आली आहे.

चीनच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल काहींच्या मनात काही गंभीर प्रश्नही निर्माण झाले आहेत. कृत्रिम उपग्रहाच्या प्रकाशाचा मानवी जीवनावर व प्राण्यांवर काही अपाय तर होणार नाही ना? असे प्रश्न काहींच्या मनात आहेत. या प्रश्नांवर उत्तर देताना प्रकाश शास्त्र (स्कुल ऑफ ऑप्टिक्स) शाळेचे संचालक कांग वेयमिंग यांनी म्हटले आहे की, या कृत्रिम उपग्रहाचा प्रकाश हा तिन्हीसांजेला असणाऱ्या प्रकाशासारखाच असणार आहे, त्यामुळे प्राणी आणि माणसाला त्यापासून काही धोखा असणार नाही. दैनंदिन जीवनावर याचा काही परिणाम होणार नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. या कृत्रिम चंद्राचा प्रकाश हा १० ते ८० किमी व्यासाच्या क्षेत्राला प्रकाशित करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे या चंद्राच्या प्रकाशाचा उपयोग पथदिव्यांना पर्याय म्हणून ठरणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे.

छायाचित्र स्रोत

चीनद्वारे तयार केल्या जाणाऱ्या या उपग्रहामागे फ्रेंच कलाकाराची कल्पना आहे, असे सांगण्यात येत असले तरी, अशा सारखेच मात्र थोड्या वेगळ्या तंत्रज्ञानाने काही प्रयोग २०१३ मध्येही झाले असल्याचे दिसते. द गार्डीयन

१) २०१३ मध्ये नार्वेच्या जुकान (Rjukan) शहरात असाच एक प्रयोग करण्यात आला होता. संगणक नियंत्रित तीन मोठे आरसे जुकान शहरावर बांधण्यात आले होते. या आरशांचे कार्य सूर्याच्या हालचालींचा वेध घेऊन सूर्यकिरणांना खाली, शहराच्या मध्यवर्ती भागात प्रतिबिंबित करण्याचे होते.

२) ‘झनाम्या प्रयोगा’च्या (Znamya Experiment) अंतर्गत १९९०च्या दशकात रशियन अंतराळवीर आणि अभियंत्यांच्या एका समूहाने अवकाशात एका उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते. सूर्याच्या किरणांना पृथ्वीकडे वळवून (डिफ्लेक्ट) रात्रीच्या वेळी पृथ्वीच्या अर्धगोलाला (हेमीस्पिअर) प्रकाशित करण्याचे कार्य यामुळे यशस्वीपणे पार पडले होते.  त्यानंतरचा टप्पा (Znamya 2.5) १९९९मध्ये प्रयोगात आणण्यात आला.

आता ही संकल्पना जुनी आहे की एकदम नवीन आहे, हे तर इतर संदर्भांतून आणि पुढील अभ्यासातून कळेलच. मात्र चीनच्या या ‘कृत्रिम चंद्र’ उपक्रमामुळे वीज आणि ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात एक नवे पाऊल उचलले जाणार आहे.  पथदिव्यांना दूर सारून शहरांच्या रस्त्यांवर रात्रीच्या प्रकाशासाठी थेट उपग्रहच वापरणे, हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उचलले अजून एक अभूतपूर्व पाऊल ठरणार आहे.

 

©marathibrain.com


तुमच्या लिखाण, अभिप्राय आणि सूचनांचे www.marathibrain.in वर स्वागत आहे.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in वर.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: