आणि त्या रात्री चीनचा कमांडिंग ऑफिसर मारला गेला !
ब्रेनवृत्त, २३ जून
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षांनंतर या भागात अद्यापही तणावाचे वातावरण आहे. मात्र गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षात चीनचा कमांडिंग ऑफिसर मारला गेला असल्याचे चीनने स्वतः मान्य केले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चुशूलमधील मोल्डो येथे बैठक सुरु असताना ही माहिती समोर आली आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, चीनमधील मोल्डो याठिकाणी दोन्ही देशातील सैन्य अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीत चीनी सैन्य अधिकाऱ्यांनी १५ जून रोजी झालेल्या संघर्षात त्यांचा कमांडिंग अधिकारी मारला गेल्याचे मान्य केले. दरम्यान, १९६७ नंतर प्रथमच मागच्या आठवड्यात गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. आठवड्याभरानंतर भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी बैठक सुरु असताना ही माहिती समोर आली आहे.
ब्रेनविश्लेषण : चीनची ‘फाइव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी’काय आहे ?
मागील आठवड्यात झालेल्या या संघर्षामध्ये कर्नल संतोष बाबू यांच्यासह आणि भारतीय १९ जवान हुतात्मा झाले, तर चीनचेही ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. गलवान खोऱ्यात हा रक्तरंजित संघर्ष झाला. त्यानंतर, तणाव वाढवायचा नसल्याने चीनने अजूनपर्यंत नेमकी जिवीतहानी किती झाली? याबद्दल काहीही स्पष्ट केले नाही.
हेही वाचा : ‘एलएसी’वरील सैन्य चीनने मागे घ्यावे !
दरम्यान, गलवान खोऱ्यातून चिनी सैन्याने माघार घ्यावी यासाठी पेट्रोलिंग पॉईँट १४ वर दोन्ही बाजूच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु होती. हा भाग नियंत्रण रेषेजवळ आहे. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ‘बफर झोन’ निर्माण करण्याचं ठरलं होतं. म्हणजेच, नियंत्रण रेषा तसेच गलवान आणि श्योक नदीच्या जंक्शनचा भाग पूर्णपणे निर्मनुष्य करण्याचा निर्णय़ झाला होता. समोरासमोरचा संघर्ष टाळण्यासाठी भारतीय सैनिक नदीच्या पश्चिमेला, तर चिनी सैनिक पूर्वेला नियंत्रण रेषेजवळ जाणार होते.
या ठिकाणी १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी आणि त्यांच्या तुकडी तैनात होती. दरम्यान, चीनी सैनिकांनी गलवान नदीच्या दक्षिण किनाऱ्यावरील बफर झोनमध्येच नवीन चौकी उभारण्याचं काम सुरु केलं. त्यावरुन नव्या वादाला सुरुवात झाली. बिहार रेजिमेंटच्या तुकडीने ही चौकी हटवण्यासाठी चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांकडे आग्रह धरतच तणाव वाढला आणि संघर्षाची स्थिती उद्भवली.