ब्रेनविश्लेषण | अनुराधा धावडे
भारतीय नागरिकांनी चीनच्या मालावर बहिष्कार टाकल्याच्या घटनांनंतर भारताने अखेर चीनमध्ये निर्मित ५९ मोबाईल अनुप्रयोगांवर (Mobile Applications) बंदी घातली. चीनला उत्तर देण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे. साध्या शब्दांत सांगायचे तर, या ऍप्सवर वापरकर्त्याची संवेदनशील माहिती मिळविणे, हेरगिरी करणे, गोपनीयतेशी तडजोड करणे, भारताचा अपप्रचार आणि राष्ट्रीय हितासाठी धोका असल्याचा आरोप आहे. त्यामुळे भारताने चीनचे हे अप्लिकेशन्स बंद केले असले, तरी शासनाचे हे पाऊल अनेक मार्गांनी योग्य वाटत आहे. दुसरीकडे, चीन या ऍप्सच्या माध्यमातून केवळ नफाच कमावत नाही, तर ग्राहकांची गुप्त माहितीदेखील मिळवत आहे.
● अनुप्रयोगांमधून वापरकर्त्यांची गोपनीय माहिती मिळविणे
चीनच्या अनुप्रयोगांवर सरसकट बंदी घालणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. परंतु चीनी अप्लिकेशन्सच्या गोपनीयता व सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त करणारा भारत हा पहिला देश नाही. यापूर्वीही अनेक देशांनी चीनी अनुप्रयोगांच्या गोपनीयता प्रणाली व सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन म्हणातात की, चिनी कंपन्यांनी त्यांचा वैचारिक व भू-राजकीय अजेंडा उंचावण्यासाठी चीनमधील ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी)’ पक्षाचे शस्त्र म्हणून काम केले आहे. तसेच सीपीसी या ऍप्सच्या माध्यमातून तुमचा सर्वात जिव्हाळ्याची माहिती गुप्तपणे गोळा करीत आहे. हे अनुप्रयोग तुमचे शब्द, आरोग्य, अभिलेख, सोशल मीडिया पोस्ट्स यांसह तुमचे मित्र, कुटूंब, तुमचे काम, खरेदी, तुम्ही कुठे आहात, याचे मॅपिंग करण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा वापर करत आहेत.
लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत-चीन सैन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने ५९ चीनी अनुप्रयोगांवर बंदी घातली आहे. परंतु या ५९ चीनी अप्लिकेशन्सवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा विशेषतः लष्करी तणावाशी संबंध नाही. ही प्रक्रिया फार पूर्वीच सुरू झाली होती. सोबतच, भारतातील अनेक गुप्तचर यंत्रणा, संस्था चीनच्या काही अनुप्रयोगांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
भारताच्या युवा बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी वापरकर्त्यांची गुप्त माहिती चोरून आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न या ऍप्सच्या माध्यमातून होत होते. दरम्यान, गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षापूर्वी एका महिना आधीच केंद्र शासनाने वापरकर्त्यांची माहिती चोरणाऱ्या अनुप्रयोगांची माहिती जाहीर केली होती. सोबतच, लोकांमध्ये या साधानांविषयी जागरूकता करण्यासाठी महत्त्वाच्या सुचना दिल्या होत्या. तसेच केंद्र शासन आभासी बैठकांसाठी वापरत असलेल्या झूम अअप्लिकेशनसाठीही काही मार्गदर्शक सूचना यात जारी करण्यात आल्या होत्या.
सर्वात आधी केंद्रशासन आयओएस आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरुन हे ऍप्लिकेशन काढण्याचा आदेश देईल. मग तेथून कोणालाही ते डाउनलोड करता येणार नाही. यानंतर, ज्या लोकांच्या मोबाईलमध्ये हे ऍप्स असतील, त्यांचे इंटरनेट सेवा प्रदाते वापरकर्त्याच्या मोबाईलमधील या अनुप्रयोगांची सेवा बंद करण्याचे आदेश जारी करतील.
> ४० टक्के चीनी स्मार्टफोन अप्लिकेशन्स
सायबर सिक्युरिटी फर्म ‘रिस्कीआयक्यू’च्या मते, सायबर स्पेसमध्ये जवळपास ९० लाख स्मार्टफोन अप्लिकेशन्स आहेत. यांतील सुमारे ४० टक्के चीनी आहेत. 2019 मध्ये 200 अब्ज वेळा हे अनुप्रयोग डाउनलोड करण्यात आले, तर यासाठी त्यांनी १२० अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. याचाच अर्थ असा आहे की, 2019 मध्ये या अॅप्सच्या डाऊनलोडमुळे चीनला 48 अब्ज डॉलर्सचा फायदा झाला आहे.
> चीनमध्येही परदेशी ऍप्सवर बंदी
चीनच्या मोबाईल अनुप्रयोगांच्या वाढीमागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या राजवटीतील परदेशी ऍप्सवर बंदी आहे. म्हणजेच, चीनमध्ये गुगल, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, नेटफ्लिक्स, यूट्यूब, बीबीसी, न्यूयॉर्क टाइम्स आणि अगदी कोरा यासारख्या लोकप्रिय अनुप्रयोगांवर बंदी आहे. दरम्यान, २०१७ मध्ये चीनने एक कायदा केला, त्यानुसार जगभरात कोणत्याही ठिकाणी सुरु होणाऱ्या चीनी कंपनीने त्या देशातील महत्त्वाची माहिती मिळवावी आणि ती रुपांतरीत करून गुप्त पद्धतीने चीनपर्यंत पोहचवावी.
> भारतात या चीनी अनुप्रयोगांवर कायमची बंदी
टिकटॉक, शेयरइट, यूसी ब्राउजर, शीन, क्वेई, बेदू मैप, क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेवर, हेलो, लाइकी, यूकैम मेकअप, एमआइ कम्युनिटी, सीएम ब्रोवर्स, वायरस क्लिनर, अपुस ब्राउजर, रोमवी, क्लब फैक्ट्री, न्यूजडॉग, ब्यूट्री प्लस, वीचौट, यूसी न्यूज, क्यूक्य मेल, वीबो, एक्सेंडर, क्यूक्यू म्यूजिक, क्यूक्यू न्यूजफीड, बिगो लाइव, सेल्फी सिटी, मेल मास्टर, पैरेलल स्पेस, एमआइ वीडियो कॉल- शाओमी, वीसिंक, ईएस फाइल एक्सप्लोरर, वीवा वीडियो- क्यूयू वीडियो आइएनसी, मेटू, वीगो वीडियो, न्यू वीडियो स्टेटस, डीयू रिकॉर्डर, वॉल्ट-हाइड, कैचे क्लिनर डीयू एप स्टूडियो, डीयू क्लिनर, डीयू ब्राउजर, हैगो प्ले विद न्यू फ्रैंड्स, कैम स्कैनर, क्लीन मास्टर- चीता मोबाइल, वंडर कैमरा, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेयर, वी मीट, स्वीट सेल्फी, बेदू ट्रांसलेट, वीमेट, क्यूक्यू इंटरनेशनल, क्यूक्यू सिक्योरिटी क्लिनर, क्यूक्यू लांचर, यू वीडियो, वी फ्लाई स्टेटस वीडियो, मोबाइल लिजेंड्स, डीयू प्राइवेसी.