मराठी भाषा उपकेंद्रासाठी सिडकोकडून भूखंडाचे हस्तांतरण

ब्रेनवृत्त । नवी मुंबई


नवी मुंबईतील ऐरोली येथे राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी सिडकोने (CIDCO) ३००० चौ. मी. क्षेत्रफळाचे भूखंड काल (मंगळवारी) शासनाला हस्तांतरित केले. महाराष्ट्राचे उद्योग आणि खनिकर्म मंत्री तसेच मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या अधिकाऱ्यांतर्फे या भूखंडाचे हस्तांतरण करण्यात आले.

राज्याच्या मराठी भाषा विभागातर्फे  नवी मुंबईतील ऐरोली येथे मराठी भाषा भवनाचे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सिडकोने राज्य शासनाला अंदाजे 3000 चौ. मी. क्षेत्रफळाचे भूखंड व संबंधित कागदपत्रे शासनाला हस्तांतरित केली.  या प्रसंगी मिलिंद गवादे, सहसचिव, मराठी भाषा विभाग,  एस. एस. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक सिडको, अनिल पवार, अपर जिल्हाधिकारी तथा महाव्यवस्थापक (वसाहत) सिडको व सिडकोचे अन्य अधिकारीदेखील उपस्थित होते. 

वाचा । राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा होणार !

“मराठी भाषा भवन उपकेंद्राची इमारत ही बहुउद्देशीय सामायिक सुविधांनी युक्त असणार आहे. या इमारतीत ग्रंथालय, बैठकांसाठी बहुउद्देशीय सभागृह यांसह भाषाविषयक विविध उपक्रमांची कार्यालये व अध्यक्षांसाठी स्वतंत्र दालनांची व्यवस्था असणार आहे”, अशी माहिती मंत्री सुभाष देसाई यांनी याप्रसंगी दिली. 

मराठी भाषा विकास आणि संवर्धनाकरिता कार्यरत असणाऱ्या भाषा संचलनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या संस्थांची कार्यालये मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. यामुळे ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणून एकसूत्रता निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने 2016 मध्ये सिडकोकडे भूखंडाबाबत विचारणा केली होती. ऐरोली येथील सेक्टर-13 मधील भूखंड क्र. 6 अ हा अंदाजे 3000 चौ. मी.चा भूखंड आहे आणि सिडकोने तो काल  दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने राज्य शासनाला दिला.

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: