उद्यापासून ११वीच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा सुरुवात
ब्रेनवृत्त | मुंबई
राज्यातील वर्ग अकरावीची प्रवेश प्रक्रिया एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणशिवाय पुन्हा सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. यानुसार उद्यापासून (दि. २६ नोव्हेंबर) ही प्रक्रिया परत सुरू होत असून, ५ डिसेंबरला गुणवत्ता यादी जाहीर होईल व ९ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. सोबतच, आधी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना वर्ग बदलण्याचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा स्थगिती दिल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात यावी अशी मागणी मराठा वर्गाकडून करण्यात आली होती. त्यामुळे प्रवेशाला स्थगिती मिळाली होती. दरम्यान, आता राज्य शासनाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया परत सुरू केली असून संबंधित शासनादेशही जारी करण्यात आला आहे.
वाचा | आदिवासी विकास क्षेत्रातील शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार
अकरावी प्रवेश प्रक्रिया अजून लांबणीवर जाऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या उद्देशाने शासनाने एसईबीसी आरक्षणाविनाच प्रवेश सुरू करण्याचे ठरवले आहे. दुसरीकडे, अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले, तरी याबाबतचा शासन निर्णय घेत नाही, अशी सर्व स्तरावरून टीका होत होती. काल मंगळवारी उच्च न्यायालयात याबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली असता न्यायालयाने शासनाला बुधवारी आपली भूमिका मांडण्याचे आदेश दिले होते.