कोव्हिड-१९ लसींविषयीची चुकीची माहिती व कटकारस्थाने सिद्धांत लसींनाच ठरताहेत मारक

आता कोव्हिड-१९वरील लस निर्माण करणे जवळपास अनेकांना शक्य होत आहे आणि याविषयी अनेक प्रायोगिक चाचणीच्या अंतिम टप्प्यातही आहेत. मात्र, लसींविषयीची कटकारस्थाने व चुकीच्या माहितीमुळे अविश्वास निर्माण होऊन लोकांनी लस स्वीकारणे टाळले, तर उत्पादित व उपलब्ध लसींचा काय उपयोग?

 

ब्रेनविश्लेषण|सागर बिसेन

विविध कारस्थानी सिद्धांत (Conspiracy Theories) व चुकीची माहिती (Misinformations) यांमुळे ‘कोव्हिड-१९’वरील संभाव्य लसींविषयी लोकांमध्ये संशयाची वृत्ती व अविश्वास वाढण्यास खतपाणी मिळू शकते, असा निष्कर्ष एका अभ्यासातून निघाला आहे. तसेच, यांमुळे संयुक्त राज्ये अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमधील समुदायांना या रोगापासून सुुटका मिळवण्यासाठी संंभाव्य लसींचा आवश्यक प्रमाणापेक्षा कमी वापर करण्याची समस्याही ओढवू शकते, असेही हा अभ्यास सांंगतो.

अमेरिका व ब्रिटन या दोन देशांतील ८,००० लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून असे आढळले आहे की, या देशांतील अर्ध्यापेक्षा कमी लोकच ‘कोव्हिड-१९’ची लस निश्चितपणे वापरणार आहेत. तर सुमारे ५५% लोकसंख्येला ‘सामुदायिक रोगप्रतिकारक शक्ती’च  (Herd Immunity) प्रदान करणे गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

या सर्वेक्षण अभ्यासाचे सह-प्रतिनिधी असलेल्या आरोग्यशास्त्र व उष्णदेशीय औषधे शाळा, लंडन (London School of Hygiene and Tropical Medicines) येथील प्राध्यापक हेेडी लार्सन (Heidi Larson) म्हणतात, “लोक स्वीकारतील तेव्हाच फक्त लसी काम करतील. चुकीची माहिती कोव्हिड लस व त्यांना तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान व साधने यांविषयी लोकांमध्ये चिंता व अनिश्चितता निर्माण करत आहेत. यामुळे कोव्हिड-१९ लसींची स्वीकार्य पातळी ढासळण्याची दाट भीती आहे.” लार्सन हे आंतरराष्ट्रीय लस विश्वास प्रकल्पाचे (Vaccine Confidence Project) संचालकही आहे.

Prof. Heidi Larson, London School of Hygiene and Tropical Medicines. स्रोत : Sky News

ब्रेनविशेष | प्रतिजन आणि प्रतिपिंड चाचणी म्हणजे नक्की काय ? 

● कसा झाला चुकीच्या महितीसंबंधीचा अभ्यास ?

अभ्यासात समाविष्ट करण्यात आलेल्यांपैकी दोन्ही देशातील प्रत्येकी ३,००० लोकांना जून ते ऑगस्ट या कालावधीत समाज माध्यमांतून कोव्हिड-१९ लसींविषयी व्यापक प्रमाणात चुकीच्या माहितीच्या प्रभावाखाली आणण्यात आले. तर, प्रत्येक देशातील उर्वरित १,००० लोकांना ‘नियंत्रण गट’ (Control Group) म्हणून कोव्हिड-१९च्या लसींविषयी वास्तविक माहिती दर्शविण्यात आली.

अभ्यासाचा सुरुवातीस, चुकीच्या माहितीच्या प्रभावाखाली येण्याआधी पहिल्या गटातील ५४% टक्के ब्रिटनवासीयांनी लसीचा ‘नक्कीच’ स्वीकार करण्याचे म्हटले व ४१.२% अमेरिकी लोकांनीही सारखीच प्रतिक्रिया दिली होती. मात्र, या गटाला ऑनलाइन पद्धतीने चुकीची माहिती दाखविल्यानंतर वरील लस स्वीकार्यतेचे प्रमाण ब्रिटन व संयुक्त राज्यांसाठी प्रत्येकी ६.४ व २.४ टक्क्यांनी कमी झाले.

वाचा | फेब्रुवारीपर्यंत किमान ५०% लोकसंख्या असेल कोरोना संक्रमित !

● काय आहेत अभ्यासातील निष्कर्ष?

लसीचा वापर नाकारणाऱ्यांमध्ये दोन्ही देशांतील पदवीचे शिक्षण नसलेले, कमी उत्पन्न गटातील व गोरे नसलेल्या लोकांचा प्रामुख्याने समावेश असल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे.

सोबतच, लस नाकारण्यात दोन्ही देशांत पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त आहे. “मात्र जर ही लस कुटुंब, मित्र व जोखीम गटांचे संरक्षण करण्यासाठी खात्रीशीर असेल, तर आम्ही तिचा वापर करू शकतो”, असेही प्रतिसाद देणाऱ्यांपैकी अनेकांनी म्हटले आहे.

हेही वाचा | कोव्हिड-१९चे रुग्ण उपचाराशिवाय बरे होतात !

अलीकडेच, जागतिक स्तरावरील एका महत्त्वाच्या लस निर्मात्याद्वारे निर्मित लसीचे आश्वासक परिणाम दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशात कोव्हिड-१९च्या लसींविषयीच्या चुकीच्या महितीसंबंधीचा हा अभ्यास महत्त्वाचा आहे. फिझर इंकॉर्पोरेटेड (Pfizer Inc.) PFE.N ने सोमवारी म्हटले की, शेवटच्या टप्प्यांमध्ये असलेल्या चाचण्यांतील अंतरिम निरीक्षणातून त्यांची प्रायोगिक कोव्हिड-१९ लस ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी आहे. कोटींच्या संख्येत जीव घेतलेल्या या साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

एकूणच, डिजिटल जग व माध्यमांतून प्रवाहित होणाऱ्या कोव्हिड-१९ संबंधीच्या माहितींमधील अस्पष्टता, चुका व अफवा, तसेच विविध कटकारस्थाने इत्यादींचा भयंकर प्रभाव लस व लस निर्मात्यांवर होतो आहे. कारण, आता लस निर्माण करणे जवळपास अनेकांना शक्य होत आहे आणि याविषयी अनेक संस्था व कंपन्या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र चुकीच्या माहितीमुळे गैरसमज निर्माण होऊन लोकांनी लस स्वीकारणे टाळले, तर उत्पादित व उपलब्ध लसींचा काय उपयोग? यात मग स्थानिक व संबंधित प्रशासनालाही काहीच करता येणार नाही. ही एक नवीच समस्या उदयास आली आहे. वरील अभ्यासात सहभागी संशोधकांनी याविषयीच वेगवेगळे निष्कर्ष व संभाव्य धोके निदर्शनास आणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: