मैत्रीचा कॉरिडॉर की भारतासाठीचा सापळा ?

ज्या पाकिस्तानात पंतप्रधान हा जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेऊन देश व आर्मी चालवण्यासाठी बनवला जातो. अशा खराब आर्थिक स्थितीत असणारा पाकिस्तान भारतीयांसाठी इतके पैसे खर्च करून कॉरिडॉर का बनवत असेल? हा मुख्य प्रश्न आहे.

१६ डिसेंबर २०१८
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये कर्तारपूर मार्गिकेचे (कॉरिडॉरचे) उद्घाटन झाले. याविषयी खूप चर्चाही रंगल्या. ‘कर्तारपूर गुरुद्वारा’ हे असे ठिकाण आहे की, जिथे शिखांचे पहिले गुरू गुरूनानक यांनी त्यांची शेवटची अठरा वर्षे काढली. वर्तमान स्थितीत कर्तारपूर हे ठिकाण भारतापासून चार किलोमीटर दूर पाकिस्तानमध्ये आहे. आता पाकिस्तान त्या चार किलोमीटर अंतरामध्ये ‘कर्तारपूर मार्गीका’ (कर्तारपूर कॉरिडॉर) निर्माण करणार आहे, जेणेकरून भारतातील शीख समुदायास कर्तारपूर गुरुद्वारेत जाता येईल.

कर्तारपूर गुरुद्वारा, पाकिस्तान

भारतीय शीख बांधवांना या मार्गिकेद्वारे कर्तारपूर गुरुद्वारेचे दर्शन करता येईल हे चांगलेच. पण हा विषय इतका सहज नाही. इथे मुख्य प्रश्न हा आहे की, ज्या पाकिस्तानात पंतप्रधान हा जागतिक बँकेकडून (World Bank)आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)कडून कर्ज घेऊन देश व आर्मी चालवण्यासाठी बनवला जातो. अशा खराब आर्थिक स्थितीत असणारा पाकिस्तान भारतीय जनतेसाठी इतके पैसे खर्च करून हा कॉरिडॉर का बनवत असेल? यामागे पाकिस्तानचा खूप मोठा कट असल्याचे दिसून येते. ते कसं? तर पाकिस्तान या कॉरिडॉरमार्फत शीख समुदायास पाकिस्तानात येण्यास परवानगी देऊन त्यांना स्वतंत्र खलिस्तानविषयी भडकवेल. अशाने भारताच्या एकतेला बाधा पोहचेल आणि भारताच्या प्रगतीला खीळ बसेल.
दुसरीकडे, याचं परिणाम म्हणून भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणावर असलेला शीख समुदाय जर बाहेर पडला, तर सैन्यात मोठी पोकळी निर्माण होईल. या कामात पाकिस्तान मदत घेत आहे खलिस्तानच्या मागणीत सर्वात पुढे असलेल्या गोपाल चावला आणि इतर लोकांची, जे आधीपासूनच पाकिस्तामध्ये आहेत. याचा परिणाम असाही होऊ शकतो की, जशी-जशी खलिस्तानची मागणी तीव्र होत जाईल, तसतसा पाकिस्तान काश्मीरच्या मुद्यावरून आक्रमक होत जाईल.

प्रस्तावित कर्तारपूर मार्गिका प्रकल्प

आता असे म्हणता येईल की, थोडे का होईना पण भारत पाकिस्तानच्या या जाळ्यात अडकलेला आहे. भारताला या मार्गिकेचा सरळसरळ विरोधही करणे सोपे नाही, आणि तसे योग्यही नाही. हे खालील बाबींवरून लक्षात येईल.
१) शीख समुदायास पाकिस्तानात जाण्यास प्रतिबंध घालणे म्हणजे त्यांच्या भावनांना ठेस पोहचणे, असा त्याचा सरळ अर्थ आहे. आणि आपल्याला माहीतच आहे, की भारतातील राजकारण हे धर्माला अनुसरून चालते. यामुळे सरकार सध्यातरी यावर ठोस पाऊल उचलणार नाही.
२) नवजोतसिंह सिद्धू (पंजाबचे उपमुख्यमंत्री) यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे जीवलग मित्र इमरान खान हे त्यांना असलेल्या शीख समुदायाच्या प्रेमापोटी हे करत आहेत. Hindustan Times
३) कॉरिडॉरच्या कामाची सुरुवात करण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून खलिस्तानच्या मागणीचे कट्टर समर्थक गोपाल चावला हे होते. त्यावेळी त्याच कार्यक्रमात हजर असलेल्या सिद्धू यांना त्यांच्याबद्दल काहीच अडचण नव्हती.
४) कर्तारपूर मार्गिकेच्या घटनेला काही न्यूज चैनल्स ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्रीचे नवे पर्व सुरु’ अशा शब्दांत मांडून भारतीय नागरिकापर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत.

स्रोत : हिंदुस्थान टाईम्स
आता असे असले तरी, भारतही परराष्ट्रीय धोरणात काही कमी नाही हेही तेवढेच खरे. जेव्हा चीनने पाकिस्तानात ग्वादार बंदर बनवून भारतावर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारताने सुध्दा इराणमध्ये चाबहार बंदर विकसित करून चीनला शह दिली. त्याचप्रमाणे भारत या परिस्थितीलाही योग्यरित्या हाताळेल अशी अपेक्षा बाळगल्यास चुकीचे ठरणार नाही. यासाठी भारत काही गोष्टी करू शकतो, जसे की या प्रकल्पाच्या संदर्भात पाकिस्तानवर काही अटी घालू शकतो. इथे खालील मुद्यांचा विचार करता येईल.
१) कर्तारपूर गुरुद्वारा हा फक्त शीख समुदायासाठीच नव्हे तर सर्वच भारतीयांसाठी खुला रहावा. कारण ‘जे आहे त्यातच संतुष्ट रहावे’ हे गुरू नानकांचे संदेश संपूर्ण जगासाठी आहे. अशाने पाकिस्तान शीख बांधवांना खलिस्तानविषयी भडकवू शकणार नाही.
२) सोबतच कर्तारपूर गुरुद्वारामध्ये व्यवस्थापन करणारे कर्मचारी हे भारतीय शीख असतील आणि ते सारखे बदलत राहतील
३) त्या कॉरिडॉरमध्ये भारतीय भाविकांना सेवा-सुविधा भारतीय नागरिकच पुरवतील.

शेवटी, एखाद्या देशाच्या भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर आणि त्यांसाठी सुविधाजनक व्यवस्था निर्माण हे नक्कीच गरजेचे आहे. मात्र, त्याचा गैरफायदा करणे चुकीचे आहे.

लेख : चैतन्य सुभाष जाधव

ई-मेल : chaitanyajadhav2017@gmail.com

ट्विटर : @KaweriChaitanya

(लेखक आंतरराष्ट्रीय संबंधांचे आणि जागतिक घडामोडींचे नव-अभ्यासक आहेत.)

◆◆◆

(प्रस्तुत लेखात प्रकाशित माहिती आणि विचार हे पूर्णतः लेखकांच्या हक्काधीन असून, मराठी ब्रेन त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.)

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: