भारतीय नागरिकाच्या खात्यात एक हजार रुपये जमा करा : अभिजित बॅनर्जी

ब्रेनवृत्त, २६ मे

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात घोषित टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुढील काही महिने प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खात्यात किमान एक हजार रुपये जमा करावेत, असा सल्ला नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. तसेच, ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अल्प उत्पन्न गटातील लोकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अभिजित बॅनर्जी यांनी केंद्राला हा सल्ला दिला आहे. तसेच, देशाची कोलमडलेली अर्थव्यवस्थेला रुळावर आणायची असेल, तर सर्वात आधी मागणीत वाढ होणे गरजेचे आहे. आणि मागणी तेव्हाच वाढेल जेव्हा लोकांमध्ये खरेदीची क्षमता असेल. मात्र, सध्यातरी देशातील जनतेच्या हातात पुरेसा पैसा नसल्यामुळे त्यांच्यात खरेदीची क्षमता नाही त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या हाती पैसे पोहोचवण्याची गरज आहे, असे बॅनर्जी म्हणाले. जेव्हा सर्वसामान्यांच्या हाती पैसे येतील, तेव्हा ते खरेदी करू शकतील. त्यांनी खर्च केल्याने मागणी वाढेल, त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असेही बॅनर्जी यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिजित बॅनर्जी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे आर्थिक सामान्य नागरिकाला मदत दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. त्याचप्रमाणे, कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर १९९१ पेक्षा मोठे संकट ओढवू शकते. तसेच, देशाच्या जीडीपीमध्येही मोठी घट होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली होती. सध्या हातात पैसा नसल्याने भारतीय नागरिकांची खरेदी क्षमता घटली आहे. अशा परिस्थितीत सरकारने आर्थिक मदत करण्याच्या बाबतीत उशीर करता कामा नये, असे बॅनर्जी म्हणाले होते.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

त्याचप्रमाणे, बॅनर्जी यांच्या पत्नी इस्टर डुफ्लो म्हणाल्या, सरकारने सार्वत्रिक किमान उत्त्पन्न (युनिव्हर्सल बेसिक इन्कम) तत्काळ लागू करण्याची गरज आहे. जनधन योजना ही याचेच एक रूप आहे. तसेच, अभिजित बॅनर्जी आणि इस्टर डुफ्लो यांनी केंद्र सरकारच्या ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ (One Nation, One Ration Card) योजनेचे कौतुक केले. ही योजना त्वरित लागू करण्याचा विचार सरकारने केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: