जाणून घ्या ५जी तंत्रज्ञानाबद्दल!

जाणून घेऊयात ‘५जी’ या अभूतपूर्व बदलांसह आपल्यासाठी लवकरच उपलब्ध होणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल या ब्रेनबीटमध्ये.

 

शनिवार, २४ नोव्हेंबर

सागर बिसेन (@sbisensagar)

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बळावर झपाट्याने प्रगती करणाऱ्या या एकविसाव्या शतकात वर्तमानाचे भूतकाळ होण्यास आणि भविष्याची नवी संरचना तयार करण्यात वेळ लागत नाही. दूरसंचार आणि आंतरजालाचे युग तर या बदलांमध्ये अग्रेसर आहे. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या १जी, २जी, ३जी आणि LTE, VoLTE असे आमूलाग्र बदल घेऊन आलेल्या ४जी (फोर्थ जनरेशन) नंतर, आता लवकरच ‘५जी’ तंत्रज्ञानही दैनंदिन वापरासाठी उपलब्ध होणार आहे. दूरसंचाराची (टेलिकम्युनिकेशन) म्हणा अथवा आंतरजालाची (इंटरनेट) म्हणा, मात्र लवकरच येणारी तंत्रज्ञानाची ‘पाचवी पिढी‘ वर्तमान तंत्रज्ञानापेक्षा अधिक जलद आणि सोयीस्कर असणार आहे.


नेमकं ५जी म्हणजे काय? या नव्या दूरसंचार पिढीचे (जनरेशन) वैशिष्ट्य काय आहेत? जगभर या तंत्रज्ञानाचा वापर कधी, कुठे आणि कसा होणार? अशा प्रश्नांची उत्तरे इथे थोडक्यात जाणून घेऊयात.

● ‘५जी’ म्हणजे काय?

दूरसंचार किंवा मोबाईलच्या क्षेत्रात काही वर्षांच्या कालावधीनंतर नियमितरित्या नेटवर्कमध्ये सुधारणा केली जाते. म्हणजेच मोबाईल कंपन्या त्यांच्या विद्यमान नेटवर्कची पुनर्बांधणी (Rebuilding) करून त्यांत सुधारणा (Upgrades) आणत असतात. या काही वर्षांच्या कालावधीत कार्यान्वित केल्या जाणाऱ्या सुधारणांना ‘जी (G)’ अर्थात ‘जनरेशन’ असे संबोधले जाते. म्हणजे, आपल्या मराठीत सांगायचे झाल्यास, दुरसंचाराशी संबंधित मोबाईल जाळ्यांमध्ये सुधारणा करून तंत्रज्ञानाच्या नव्या पिढीला (जनरेशन) जन्म देणे.

आतापर्यंत १ जी, २जी, ३जी आणि ४जी अशा चार जनरेशन्स आपण वापरत आलेलो आहोत. लवकरच येणारे ‘५जी’ नेटवर्क हे सद्या वापरात असलेल्या ‘4G LTE’ या नेटवर्कचे सुधारित रूप असणार आहे.

‘५ जी’ खालील तीन नव्या सुधारणांसह (Upgrades) आपल्यासमोर सेवेस हजर राहील.

१) कमी प्रलंबित्व किंवा प्रतिसाद देण्यास नेटवर्कचे किमान विलंब ( Minimum Latency Rate Or Mininmal Network Response Lag)
२) मोठ्या प्रमाणत जलद गतीने माहिती प्रसार आणि हस्तांतरण (High Speed Data Transfer)
३) बॅटरीचा कमी वापर (Reduced Battery Power Consumption)

हेही वाचा : कसे तयार कराल ‘व्हाट्सऍप स्टिकर्स’ ?

● ५जी ची वैशिष्ट्ये:

१. नेटवर्कच्या प्रत्येक पिढीत आंतरजालाची (इंटरनेट) गती वाढत गेलेली दिसते आणि हेच सर्वांना अपेक्षित असते. ५जी मध्ये सर्वसामान्य उपभोक्त्यांसाठी आंतरजालाची ही गती प्रति सेकंद १०,००० मेगाबाईट्स (एमबीपीएस) या आकड्याला स्पर्श करणारी असेल. म्हणजे कमीतकमी ५जी आंतरजालाची गती ४जी पेक्षा दहापट जास्त असणार आहे.

२. आंतरजालाच्या वापरासोबतच दैनंदिन जीवनातील घडामोडींवरही अभूतपूर्व परिणाम यामुळे बघायला मिळणार आहेत. आभासी आणि वाढवी वास्तविकता (Virtual and Augmented Reality) ५जी मुळे प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे.

आभासी जगातील गोष्टी ५जी मुळे प्रत्यक्षात अनुभवणे शक्य होणार आहे.

३. यामुळे असंख्य मोबाईल माहितीची सतत देवाणघेवाण करणार आणि संदेशन (Continuous Data Collection and Transfer) करत राहणार आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातील वस्तूंशी आपला मोबाईल जोडला जाणार आहे. स्वनियंत्रीत चारचाकी (Autonomous Vehicles) वाहनांपासून तर घरच्या शीतकपाटापर्यंतच्या गोष्टी मोबाईलशी जोडल्या जाऊ शकतात.

 

● आधीच्या जनरेशन आणि ५जी यांतील तुलना:

आधीच्या तुलनेत ५जी नेटवर्क दहापट जास्त जलद असणार आहे. ३जी आणि ४जी यांमध्ये आंतरजालची गती अनुक्रमे ३.१ आणि १,००० एमबीपीएस इतकी आहे. ५जी मध्ये आंतरजालची गती १०,००० एमबीपीएस इतकी असणार आहे.

हे वाचलंत का? ‘डेटा’मय समाज माध्यमे आणि ‘सोशल इंजिनिअरिंग’

● ५जी बद्दलची जागतिक ओढ:

५जी तंत्रज्ञान फक्त आंतरजालचीच गती वाढवणार नाहीये, तर त्यासोबतच मानवीय जीवनालाही तितकंच तंत्रस्नेही होण्यास भाग पाडणार आहे. तसं, पाचव्या पिढीच्या या तंत्रज्ञानाचा साधारण लोकांसाठीचा अधिकृत वापर सुरू होण्यास काही महिनेच उरलेले आहेत. तरीही, अमेरिकेच्या व्हेरिझोन दूरसंचार कंपनीने ‘जगातील पहिली व्यवसायिक ५जी सेवा‘ इंडियानापोलिस, हौस्टन, सॅक्रमेंटो, लॉस एंजेलस या शहरांमध्ये सुरू केली आहे. घरगुती ब्रॉडबँडच्या स्वरूपातील ही सेवा आहे.

जगातील तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या देशांमध्ये ५जी सेवेचा प्रसार मुख्यत्वाने तीन टप्प्यात होईल असे दिसते.

१) सर्वप्रथम, संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील व्हेरिझोन, स्प्रिंट, टी-मोबाईल आणि एटी अँड टी या कंपन्या व सोबतच दक्षिण कोरियामध्ये येत्या २०१९ च्या पूर्वार्धात, म्हणजेच मार्च, २०१९ मध्ये ५ जी सेवेला सुरुवात होईल. त्यांनतर, २०१९च्या शेवटीशेवटी जपानमध्ये ही सेवा सुरू होईल.

२) २०२० पर्यंत चीन आणि इतर पश्चिमी देशांमध्ये ५जी सेवेला सुरुवात होईल. सोबतच, भारतातही सुरुवातीच्या प्रकल्पांमध्ये या सुविधेला सुरुवात होणार आहे.

३) भारतात २०२२पर्यंत पूर्णतः ५जी तंत्रज्ञानाचे जाळे विस्तारले जातील.


दरम्यान, स्मार्टफोन जगतात सध्या अग्रेसर असलेल्या OnePlus, Huawei आणि Xiaomi या कंपन्या ‘जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन’ तयार करण्याच्या स्पर्धेत आहेत.

● ५जी चे संभाव्य धोके आणि जोखीम :

‘५जी’ हे तंत्रज्ञान जितके जलद आणि सोयीस्कर असणार आहे, तितकेच ते संवेदनशील आणि धोकादायक ठरू शकेल असे आहे. ५जी तंत्रज्ञानामुळे मोबाईल फोन अभूतपूर्व प्रमाणावर माहिती संकलित करणार आहेत. त्यामुळे डेटा संचयन (Data Collection) सोबतच खाजगी बाबींविषयीच्या धोक्याच्या शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, ५जी तंत्रज्ञानामुळे इतर नेटवर्कला टाळत मोबाईल थेट आंतरजालाशी जुडणार आहेत. त्यामुळे हॅकिंग सारख्या प्रकरणांचीही वाढ होऊ शकते आणि असुरक्षतेत (Vulnerabilities) वाढ होणे सहज शक्य आहे.

 

(संदर्भ  : Wall Street Journal, Gadgets Now & Times of India)

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: