शेतकऱ्यांचे प्राधान्य स्थानिक बाजारांना; कृउबास, शासकीय संस्था नाराजीचे केंद्र!

ब्रेनवृत्त । पुणे 


बहुतांश भारतीय शेतकरी त्यांच्या शेतमालाला अजूनही स्थानिक बाजारपेठेतच विकत असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO : National Statistical Office) ७७व्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातून आढळले आहे. ‘भारतीय कुटुंबांकडे असलेली जमीन व पशुधन आणि शेतकरी कुटूंबांच्या परिस्थितीचे मूल्यांकन‘ या शीर्षकाने या सर्वेक्षणाचा पाहणी अहवाल कार्यालयाने जाहीर केला आहे. 

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ७७व्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणानुसार (National Sample Survey), शेतकऱ्यांच्या उत्पादनांच्या खरेदीमध्ये शासकीय संस्था व कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी : ऍग्रिकल्चरल प्रोड्युस मार्केट कमिटी) यांचा वाटा अतिशय क्षुल्लक म्हणजेच तुलनेने खूप कमी आहे. 

 

सर्वेक्षणात समाविष्ट करण्यात आलेल्या पिकांपैकी १८ प्रकारच्या पिकांचे ५५ ते ९३% उत्पादन शेतकरी त्याच्या परिसरातील स्थानिक बाजारातच विकतात. यांमध्ये तांदूळ (धान), गहू व तूळ यांचाही समावेश आहे. या पिकांच्या उत्पादनाचा फक्त ३ ते २२% भाग कृषी उत्त्पन्न बाजार समितीत (कृउबास) विक्री होतो, तर इतर शासकीय संस्थांमध्ये फक्त २ ते १४% उत्पादन विकले जाते. यावरून हे लक्षात येते, की विविध कारणांमुळे शेतकरी अजूनही स्थानिक बाजरांना प्राधान्य देतात.

अजून पुढील पाच महिने मिळणार अतिरिक्त अन्नधान्य !

> धान (तांदूळ) आणि गहूच्या विक्रीची स्थिती

सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, भात पीक घेणारे शेतकरी एकूण धान उत्पादनापैकी ७५.१०% उत्पादन स्थानिक बाजारांमध्ये विकतात. यामध्ये शासकीय संस्था व एपीएमसी यांचा खरेदीचा वाटा एकूण १०.५% इतकाच आहे.

दुसरीकडे, गहू उत्पादक शेतकरी एकूण उत्पादनापैकी ६६% गहू स्थानिक बाजारपेठेत विकतात. २६% गहूची खरेदी शासकीय संस्था व कृषी उत्पन्न बाजार समिती यांद्वारे केली जाते.

विशेष म्हणजे, शासकीय संस्था व कृउबास यांद्वारे सर्वाधिक खरेदी केल्या जाणाऱ्या पिकांमध्ये भातपीक (धान), गहू व ऊस यांचा अनुक्रमे सर्वाधिक वाटा आहे. या पिकांसाठी निर्धारित असलेली इतरांच्या तुलनेत सर्वांत कमी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) व आधीपासून प्रस्थापित असलेले स्थानिक खरेदी मार्ग यांमुळे अशी परिस्थिती आहे.

सोबतच, स्थानिक बाजारपेठेत शेतमालाची विक्री करणारे शेतकरी समाधानी आहेत का? या प्रश्नावर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने विचार केला आहे. सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार बहुतांश शेतकरी त्यांच्या शेतमालाला स्थानिक स्तरावरील बाजारपेठेतून मिळणाऱ्या भावाने ‘समाधानी’ आहेत. ‘समाधानी’ असल्याची प्रतिक्रिया देणाऱ्या या शेतकऱ्यांमध्ये ५९% टक्के धान शेतकरी व ६६.२% गहू उत्पादक शेतकरी समाविष्ट आहेत. परंतु, डाळींच्या बाबतीत शेतकरी तुलनेने कमी समाधानी आहेत. उडद उत्पादकांपैकी फक्त ४०% शेतकरी समाधानी असल्याचे दिसते, तर तुळीच्या बाबतीत हे प्रमाण ५१% इतके आहे. 

 नक्की वाचा । ऍक्वापोनिक्स : नाविन्यपूर्ण व आधुनिक शेती प्रणाली

> शेतकरी असमाधानी असण्याची कारणे

शेतकऱ्यांमध्ये शेतमाल उत्पादन व उत्पन्न यांबाबत असलेली नाराजी मुख्यत्वाने कोणत्या कारणांमुळे आहे, याचा विचारही सर्वेक्षणात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या असमाधानाची पाच मुख्य कारणे सर्वेक्षणात सांगण्यात आली आहेत.

  1. बाजारपेठेपेक्षा कमी मूल्य 
  2. देयकांमध्ये उशीर होणे 
  3. कर्ज घेतल्यामुळे होणारी कपात 
  4. वजन मापन व दर्जा ठरवण्याची चुकीची/फसवी पद्धत 
  5. इतर कारणे

वरीलपैकी सर्वांत मुख्य कारण हे बाजारपेठेत शेतमालाला योग्य भाव किंवा अतिशय कमी भाव मिळणे हे आहे. यांमध्ये धान उत्पादन शेतकरी सर्वाधिक नाराज आहेत.

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: