फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थ्यांचे उपोषण

ब्रेनवृत, पुणे

१७ जून २०१९

महाराष्ट्रातील नावाजलेल्या महाविद्यालयांपैकी एक असलेल्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी शुल्कवाढ करून दुप्पट करण्याचे ठरवले आहे. प्रशासनाच्या ह्या अनपेक्षित आणि काही ठोस कारण नसताना केलेल्या फी वाढीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी उपोषण पुकारले आहे. सोबतच महाविद्यालयातील मेसचे मासिक शुल्कही वाढवण्यात आले आहे. प्राचार्यांना शुल्कवाढ मागे घेण्यासाठी किंवा त्यात कपात करण्यासाठी दिलेले निवेदन त्यांनी मंजूर न केल्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर भर उन्हात उपोषणावर बसले.

फर्ग्युसन महाविद्यालयाने केलेल्या शुल्कवाढीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी उपोषण पुकारले

सध्या नव्या शैक्षणिक सत्राच्या प्रवेशांना सुरुवात झाली आहे व सगळीकडे प्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत. अशात खाजगी आणि स्वायत्त संस्था फी वाढ, अभ्यासक्रमांत विषयांचे फेरबदल वा शिक्षणाचे माध्यम कसे मर्यादित करता येईल, अशा विविध प्रयोगांत गुंतलेल्या असतात. पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयात राज्यभरातूनच नव्हे, तर देशभरातून मुले शिकण्यासाठी येत असतात. मात्र, महाविद्यालयाने स्वायत्तता व पायाभूत सुविधांचे कारण सांगत नव्या शैक्षणिक वर्षासाठी तब्बल दुप्पट शैक्षणिक शुल्क आकारण्याचे ठरवले आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या या महाविद्यालयाची फी सोसायटीची निर्णयानुसार सुमार ५०-१०० टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. ही शुल्कवाढ प्रथमवर्ष बी.ए., प्रथम वर्ष बी.एस्सी. व इतर अभ्यासक्रमांसाठी आहे. महाविद्यालय व संस्थेने केलेली ही शुल्कवाढ ग्रामीण भागातील, शेतकरी वर्गातील व कुठेतरी काम करून पैशाची तडजोड करून शिकणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना परवडेल अशी नसल्याचे विद्यार्थ्यांच्या मनोगतातून कळते.

मागील शैक्षणिक वर्षासाठी बी. ए. अंतिम वर्ष व बी. एस्सी. अंतिम वर्षाची फी अनुक्रमे ₹5,270 व ₹5,800 इतकी होती. मात्र, यात वाढ करून ती अनुक्रमे ₹9,225 व ₹11, 045 एवढी करण्यात आली आहे. सोबतच मेसचे मासिक भाडे ₹2,700 प्रति महिन्यावरून ₹2,900 करण्यात आले आहे. म्हणजे सुमारे 50 टक्क्यांपेक्षा जास्त भाववाढ करण्यात आली आहे. Pune Mirror

https://m.facebook.com/story.php?story_fbid=375754493065669&id=452198151902603

महाविद्यालयाने अचानक केलेली दुप्पट फीस महाविद्यालयातील सामान्य व बहुतांश विद्यार्थ्यांना परवडणारी नाही आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना हि शुल्कवाढ मागे घेण्याचे अथवा ती कमी करण्यासाजे लेखी निवेदन दिले. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने यावर कोणतेही समाधानकारक उत्तर विद्यार्थ्यांना दिले नाही. कॅम्पस मेंटेनन्स व इतर सुविधांसाठी ही शुल्कवाढ केली असल्यामुळे ही शुल्कवाढीत कोणतीही कपात होणार नसल्याचे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी विद्यार्थ्यांना बजावले. स्वायत्तता मिळाल्यापासून महाविद्यालयाने शुल्कवाढ केली नसल्यामुळे, ती आता करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.

महाविद्यालयाच्या प्राचार्यांना शुल्कवाढीत कपात करण्याचे निवेदन देताना विद्यार्थी

 

महाविद्यालयाचा हा निर्णय ग्रामीण भागातून व गरीब परिस्थितीतून उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची दालने बंद करणार असल्याच्या कारणामुळे विद्यार्थी नाराज आहेत. सोबतच, ही शुल्कवाढ यावर्षीच का करण्यात येत आहे? असाही प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी शुल्कवाढ व महाविद्यालयाच्या या निर्णयाविरोधात उपोषण पुकारले आहे. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीजवळ दुपारी सुमारे बारा वाजेपासून विद्यार्थी उन्हाची पर्वा न करता न्यायासाठी उपोषणाला बसली. शुल्कवाढीच्या मुद्याबरोबरच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विषयांच्या निवडीतील महाविद्यालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आणला. बी. ए. द्वितीय वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून ऐच्छिक विषयांच्या निवडीवर महाविद्यालयाने मर्यादा आणली आहे. शिक्षकांची कमी व पगाराचे कारण सांगत महाविद्यालयाने मराठी माध्यमातून विषय निवडण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसाठी बंद केला आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजाने आहेत ते विषय घ्यावे लागणार आहेत किंवा महाविद्यालय सोडावे लागणार आहे.

दुसरीकडे, फर्ग्युसन महाविद्यालयाला फक्त शैक्षणिक स्वायत्तता प्राप्त आहे. त्यामुळे आर्थिक स्वायत्तता नसलेल्या या महाविद्यालयाने केलेला शुल्कवाढीचा निर्णय कितपत योग्य आहे, हे अजून प्रश्नांकितच आहे. मुलांनी शुल्कवाढीच्या विरोधात स्वीकारलेल्या व स्वस्त-स्वच्छ शिक्षणाची मागणी करण्यासाठी स्वीकारलेल्या उपोषणाच्या पर्यायाला महाविद्यालय प्रशासन काय प्रतिसाद देते ते महत्त्वाचे आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: