छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी कालवश !
छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री व जनता काँग्रेस छत्तीसगड पक्षाचे संस्थापक अजित जोगी यांचे काल निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या शरीरातील हृदयक्रिया बंद पडल्यानंतर ९ मेपासून त्यांच्यावर रायपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
ब्रेनवृत्त, रायपूर
छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री व जनता काँग्रेस छत्तीसगड पक्षाचे संस्थापक अजित जोगी यांचे काल निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या शरीरातील हृदयक्रिया बंद पडल्यानंतर ९ मेपासून त्यांच्यावर रायपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे पुत्र अमित जोगी यांनी काल दुपारी त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याचे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले.
७४ वर्षांच्या अजित जोगी यांच्या ९ मे रोजी हृदयक्रिया बंद पडल्या होत्या, त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, रायपूरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल दुपारी ३.३० च्या सुमारास त्यांचे पुत्र अमित जोगी यांनी ट्विट करत छत्तीसगड राज्यांने आपले वडील गमावले असल्याचे सांगत शोक व्यक्त केले. त्यांचा अंत्यविधी आज त्यांच्या मूळगावी होणार आहे. “मीच नाही, तर संपूर्ण छत्तीसगडने त्याच्या वडिलांना गमावले आहे. गोरेला या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत”, असे अमित यांनी ट्विटत म्हटले.
२० वर्षीय युवा छत्तीसगढ़ राज्य के सिर से आज उसके पिता का साया उठ गया।केवल मैंने ही नहीं बल्कि छत्तीसगढ़ ने नेता नहीं,अपना पिता खोया है।माननीय अजीत जोगी जी ढाई करोड़ लोगों के अपने परिवार को छोड़ कर,ईश्वर के पास चले गए।गांव-गरीब का सहारा,छत्तीसगढ़ का दुलारा,हमसे बहुत दूर चला गया। pic.twitter.com/RPPqYuZ0YS
— Amit Ajit Jogi (@amitjogi) May 29, 2020
मध्यप्रदेश राज्याचे विभाजन होऊन छत्तीसगड राज्याची निर्मिती झाल्यानंतर सन २००० मध्ये अजित जोगी राज्याचे मुख्यमंत्री बनले. नोव्हेंबर, २००० ते नोव्हेंबर, २००३ या कार्यकाळात ते मुख्यमंत्री होते. सन २०१६ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून बाहेर पडत त्यांनी जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
● आयपीएस व आयएएस अधिकारी होते अजित जोगी
राजकारण येण्याआधी अजित जोगी यांनी प्रशासनातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय पोलीस सेवेत निवड झाली होती. सन १९८१ ते १९८५ दरम्यान ते मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाची धुरा संभाळण्याआधी ते राज्यसभेत मध्यप्रदेशातून खासदार होते.
◆◆◆