पहिल्यांदाच तयार होणार भारताचा जनुकीय नकाशा

पहिल्यांदाच देेशाचे सांस्कृतिक व सामाजिक वैविध्य दर्शवणारा भारताचा जनुकीय नकाशा तयार केला जाणार असूूून, यासाठी जैवतंत्रज्ञान विभागातर्फे नवीन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

 

ब्रेनवृत्त | पुणे

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत लवकरच पहिल्यांदाच सांस्कृतिक व सामाजिक वैविध्य दर्शवणारा भारताचा जनुकीय नकाशा तयार केला जाणार आहे. यासाठी विभागातर्फे नवीन प्रकल्प हाती घेण्यात आला असून, याद्वारे जनुकीय क्रमवारीतेच्या साहाय्याने भारतीयांच्या आरोग्याचे विश्लेषण करण्यास मदत होणार आहे.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून यंदा जानेवारी महिन्यात ‘जिनोम इंडिया-कॅटलॉगिंग द जेनेटिक व्हेरिएशन्स इन इंडियन्स’ (Genome India) या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांतर्गत जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे भारतीयांच्या आरोग्याचे विश्लेषण केले जाणार असून, देशाचे वैद्यकीय धोरण ठरवण्यासाठी हा प्रकल्प मूलगामी ठरू शकेल. जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबवला जात असून, बंगळुरूस्थित भारतीय विज्ञान संस्थेच्या मेंदू संशोधन केंद्राच्या (Centre for Brain Research, IISc Bangalore) संचालिका प्रा. विजयालक्ष्मी रवींद्रनाथ प्रकल्पाच्या राष्ट्रीय समन्वयक आहेत.

या प्रकल्पात सहभागी असलेल्या वरिष्ठ संशोधक, ‘आयसर पुणे’च्या डॉ. मयूरिका लाहिरी म्हणाल्या, “या प्रकल्पात वैद्यकीय, माहिती तंत्रज्ञान, जनुकशास्त्र, मानवशास्त्र, विदा विश्लेषण अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग आहे. देशभरातील बारा रुग्णालयांच्या माध्यमातून त्या-त्या भागांतील नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करून जनुकीय विश्लेषण केले जाईल. बंगळुरुचे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, हैदराबादमधील सेंटर फॉर सेल्युलर मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी), कोलकात्याचे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोमेडिकल जिनॉमिक्स (एनआयबीएमजी), दिल्लीचे इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स इंट्रागेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) येथे हे ‘जिनोम क्रमवारी’ (Genome Sequencing) केली जाईल.

वाचा | जाणून घ्या ५जी तंत्रज्ञानाबद्दल!

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील १८ ते ७० या वयोगटातील सुमारे बाराशे निरोगी नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित केले जातील. त्या नमुन्यांची वैद्यकीय तपासणी करून सहभागी झालेल्या नागरिकांना त्याचे अहवाल मोफत दिले जातील. राज्यभरातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्याची प्रक्रिया पुण्यात सुरू झाली आहे, अशी माहिती प्रकल्पातील वरिष्ठ संशोधक डॉ. संतोष दीक्षित यांनी दिली.

जगभरातील अनेक प्रगत देशांनी जिनोम संबंधित मोठे प्रकल्प राबवले आहेत. ‘जिनोम इंडिया’ प्रकल्पातून आता भारतही त्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. गेल्या दशकात देशात जनुकीय क्षेत्रांत काही प्रकल्प राबवण्यात आले, मात्र राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच राबवल्या जात असलेल्या या प्रकल्पात देशभरातील नामवंत बावीस संशोधन संस्थांचा सहभाग आहे.

ब्रेनविश्लेषण | प्रतिजन आणि प्रतिपिंड चाचणी म्हणजे नक्की काय ? 

● जनुकीय नकाशात नेमकं काय असेल?

या प्रणालीत रक्ताच्या नमुन्यांचे संकलन करून हिमोग्राम, मेदाचे प्रमाण, शर्करेचे प्रमाण, यकृत आणि मूत्रपिंड कार्यक्षमता, रक्तदाब असे विश्लेषण केले जाईल. त्यानंतर रक्तातून डीएनए वेगळा करून सुमारे चोवीस हजार जनुकांचं पृथ:करण केले जाईल. अशा पद्धतीने दहा हजार व्यक्तींची माहिती संकलित झाल्यावर जनुकीय नकाशा तयार होईल. त्यावरून भारतीय रोग-विकारांचे स्वरूप, त्याची मूलभूत जनुकीय कारणे याचा शोध घेता येईल.

या प्रकल्पाच्या सहमुख्य संशोधक असलेल्या प्रा. एल.एस.शशिधरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या १३० कोटी लोकसंख्येत सुमारे साडेचार हजार वांशिक समूह आहेत. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील दहा हजार निरोगी नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जाईल. त्यातून भारतीयांच्या जनुकीय वैविध्याचा प्राथमिक अंदाज येईल. भारतातील जैव-वैद्यकीय संशोधनाच्या दृष्टीने जिनोम इंडिया हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

सोबतच, देशाच्या वैद्यकीय व जैवतंत्रज्ञान संशोधनाच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाच्या प्रकल्प असून, यात लोकसहभाग आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी researchadmin@prashanticancercare.org या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही संबंधित संशोधकांकडून करण्यात आले आहे.

 

Join Us @marathibraincom

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: