कोव्हिड-१९च्या पार्श्वभूमीवर शासन राबवणार ‘अन्न सुरक्षा मोहीम’

ब्रेनवृत्त | मुंबई

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला सुरक्षित, निर्भेळ आणि आरोग्यदायी अन्न मिळावे यासाठी ‘अन्न सुरक्षा अंकेक्षण’ (Food Safety Audit) ही विशेष मोहीम राज्यभरात राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिली आहे.

कोव्हिड-१९’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला योग्य व सुरक्षित अन्न मिळावे यासाठी राज्य शासन राज्यातील अन्नपदार्थ वितरक व खाद्य उत्पादनांची तपासणी करणार आहे. या संदर्भात डॉ. शिंगणे यांनी आज मंत्रालयात विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यभर ‘अन्न सुरक्षा अंकेक्षण’ ही विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये हात धुणे, सामाजिक अंतर राखणे तसेच स्वच्छ आणि व्यवस्थित शिजवलेले अन्न खाणे यावरही भर दिला जातो. टाळेबंदीनंतर आता हॉटेल्स आणि बाहेरील खाद्य पदार्थ विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. शिंगणे यांनी ही मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.

वाचा | कोव्हिड-१९वर मात केलेल्यांना ‘थायरॉईड’चा धोका !

● मानकांची पूर्तता करणाऱ्यांना मिळणार प्रमाणपत्र

अन्न पदार्थ तयार करणाऱ्या व वितरक आस्थापनांनी त्यांना अन्न सुरक्षेबाबत देण्यात आलेल्या निकषांची पूर्तता करावी आणि केंद्र शासनाच्या भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI : Food Safety and Standard Authority of India) यांनी अधिकृत ममान्यता प्राप्त 26 अंकेक्षण संस्थांमार्फत (ऑडिट एजन्सी) परीक्षण करुन घ्यावे, असे निर्देश या मोहिमेअंतर्गत देण्यात आले आहेत.

अंकेक्षण झाल्यानंतर या मानकांची पूर्तता करणाऱ्या आस्थापनांना या ऑडिट संस्थांमार्फत प्रमाणपत्र दिले जाईल. यामुळे ग्राहकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न पदार्थ पुरविले जाण्याची हमी मिळणार असल्याचेही शिंगणे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा | १० राज्यांत २८ अन्न प्रक्रिया प्रकल्पांना केंद्राची मंजूरी

सोबतच, 26 ऑडिट संस्थांमार्फत हायजिन मानांकन घेण्याची कार्यवाही हाती घेण्यात येईल जेणेकरून अन्नपदार्थ पुरविणाऱ्या आस्थापनांमध्ये चढाओढ निर्माण होऊन ग्राहकांना सुरक्षित अन्न पदार्थ मिळू शकतील. तसेेेच, अंतर्गत व्यावसायिक स्पर्धेमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यदायी वातावरण राखण्यास स्पर्धा निर्माण होईल, असा या मोहिमेचे उद्देश आहे. तसेच, ग्राहकांना अभिप्राय (फिडबॅक) घेण्यासाठी आणि ग्राहकांनाही रेटिंग देता यावे यासाठी विशेष मोबाईल अनुप्रयोग तयार करण्यात यावे, असे निर्देशही डॉ. शिंगणे यांनी दिले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: