माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज एम्समध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने देशात शोककळा पसरली आहे आणि विविध स्तरांवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज उपचारा दरम्यान दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. ते 66 वर्षाचे होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने गेल्या दोन आठवड्यांपूर्वी जेटली यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
अनेक शारीरिक व्याधींनी ग्रस्त असल्याने गेल्या काही वर्षांपासून जेटली यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत होते. सप्टेंबर 2014मध्ये त्यांच्यावर बॅरिएट्रिक ऑपरेशन करण्यात आले होते. मधुमेहामुळे वाढत जाणाऱ्या वजनावर आळा घालण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आले होते. तर त्याआधी त्यांच्या हृदयचेही ऑपरेशन झाले होते. 2018 मध्ये त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर, जवळ जवळ 100 दिवस ते अर्थ मंत्रालयात येऊ शकले नव्हते. त्या काळात पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.
मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जेटली यांनी पंतप्रधान मोदींनी पत्र लिहून मंत्रिपदासाठी आपला विचार करू नये अशी विनंती केली होती. गेल्या 18 महिन्यांपासून प्रकृती खराब असल्याने आपण जबाबदारी पार पाडू शकत नाही, त्यामुळे मंत्रिमंडळात आपला विचार करू नये, असे त्यांनी म्हटले होते. मागील काही दिवसांपासून प्रकृती गंभीर असल्याने दोन आठवड्यांपूर्वीच जेटली यांना परत एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी अनेक जेष्ठ नेते त्यांना भेट देऊन गेले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
‘सुपरमॉम’ सुषमा स्वराज यांचे निधन !
एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून जेटली यांनी ओळख असली तरी ते शिक्षणाने व व्यवसायाने वकील होते. वकीलीचे शिक्षण पूर्ण करून जेटली यांनी 1987पासून सर्वोच्च न्यायालयात आणि अनेक उच्च न्यायालयात वकिली सुरु केली. 1990 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अशी त्यांची ओळख तयार झाली होती.
Vice-President, M Venkaiah Naidu on #ArunJaitley: His death is an irreparable loss for the country and personally to me also. I have no words to express my grief. He was a powerful intellectual, an able administrator and a man of impeccable integrity. pic.twitter.com/HjX18WLZyz
— ANI (@ANI) August 24, 2019
दरम्यान, याच महिन्यात 6 ऑगस्टला भाजपच्या नेत्या आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले. त्यानंतर आता जेटली यांच्या निधनामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. देशातील राजकीय पटलावरपण एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दोन वरिष्ठ राजकारणी देशाने गमावले आहेत. याप्रसंगी देशभरातून व विविध स्तरांतून जेटलींनी श्रद्धांजली वाहिली जात आहे व कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.
◆◆◆