बच्चू कडूंसह चार आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा

विधानसभा निवडणूकीत भंडारा आणि रामटेक मधून निवडून आलेल्या दोन अपक्ष आमदारांसह आता प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोन आमदारांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.

 

ब्रेनवृत्त, प्रतिनिधी

मुंबई, २७ ऑक्टोबर

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर आता ऐन दिवाळीच्या पर्वावर सत्तास्थापनेची विविध समीकरणे तयार होऊ लागली आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्यासह इतर तीन आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे शिवसेनेच्या एकूण आमदारांची संख्या ५६ वरून ६० झाली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर, आता प्रहार जनशक्ती पक्षाच्या आमदारांनीही शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी काल मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या दोघांनी पाठिंबा दर्शवला.

यामुळे शिवसेनेची विधानसभेतील आमदारांची 60 वर पोहोचली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत, तर काल या चार आमदारांनी जाहीर केलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता 60 वर पोहोचली आहे.

मोदींचा सवाल, “शरद पवार साताऱ्यातून का लढत नाहीत ?”

दरम्यान, शेतातील पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोहयोतून व्हावी, दिव्यांग व आदिवासी बांधवांच्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करणे, अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघातील समस्या सोडवणे, अशा अनेक मुुुद्यांवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचे, आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, भंडारा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेतून बाहेर पडलेले बंडखोर नेते होते. मात्र, त्यांनी आता परत शिवसेना पाठिंबा जाहीर केला आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: