फ्रान्सने गुगलवर ठोठावला ५०० दशलक्ष युरोंचा दंड!

ब्रेनवृत्त । पॅरिस


फ्रान्सच्या स्पर्धा आयोगाने आंतरजाल विश्वातील महाकाय तंत्रज्ञान कंपनी गुगलवर तब्बल ५०० दशलक्ष युरोंचा (५९३ मिलियन डॉलर्स) दंड ठोठावला आहे. स्थानिक वृत्त माध्यमांशी फसवेगिरी केल्या प्रकरणी व युरोपीय संघाच्या मुद्रणहक्क नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून गुगलवर हा दंड आकारण्यात आला आहे.

फ्रान्समधील वृत्त माध्यमांशी केलेल्या कराराच्या अटींचे गुगलने पालन न केल्या प्रकरणी गुगलवर फ्रान्सच्या स्पर्धा आयोगाने ५०० दशलक्ष युरोंचा दंड ठोठावला आहे. गुगल न्यूज (Google News) या व्यासपीठावर वृत्त माध्यमांचे मजकूर सामायिक करताना गुगल या माध्यमांशी प्रामाणिक करार करण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे गुगलकडून युरोपीय संघाच्या मुद्रणाधिकार नियमांचे उल्लंघन झाले आहे, असे स्पर्धा आयोगाने म्हटले आहे. 

एप्रिल, २०२० मध्ये फ्रान्सच्या नियंत्रकाने गुगलला तिच्या गुगल न्यूज व्यासपीठावर स्थानिक माध्यमांच्या बातम्यांचे मजकूर सामायिक करण्यासाठी संबंधित माध्यमांसोबत एक प्रामाणिक करार करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, हा करार गुगलकडून अपेक्षितरित्या पार पाडण्यात आलेला नाही, असे नियंत्रकाने म्हटले आहे. मागील काही वर्षांत युरोपीय देशांकडून गुगलवर असे अनेक दंड आकारण्यात आले असून, आता या यादीत अजून एका दंडाची भर पडली आहे.

वाचा । जगभरातील कंपन्या घेणार ₹१०० अब्जाहून अधिकचे कर्ज!

“प्राधिकरणाच्या आदेशाची अवमानना केल्याप्रकरणी आकारण्यात आलेला ‘आतापर्यंत हा सर्वांत मोठा दंड’ आहे.  गुगलच्या उणिवांना प्रकाशझोतात आणण्यासाठी हा दंड आकारला गेला आहे”, असे स्पर्धा आयोगाचे प्रमुख इसाबेल डी सिल्वा यांनी पत्रकारांना सांगितले. माध्यमांच्या कॉपीराईट सामग्रीचा वापर केल्यामुळे गुगलने संबंधित माध्यमांना भरपाई द्यावी किंवा मग होणाऱ्या अतिरिक्त नुकसानासाठी दरदिवशी ९ लाख युरोंची जोखीम राशी द्यावी, असे आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे. 

युरोपीय संघाच्या अलीकडील मार्गदर्शक नियमांनुसार, ऑनलाईन बातमी सामग्रीच्या मोबदल्यात पुरवठादार माध्यमांना पैसे देण्यासाठी एक सामायिक आधार निवडणे गरजेचे आहे. मात्र याबाबतीत खुल्या स्वरूपात प्रामाणिक चर्चा करण्यास गुगल अपयशी ठरल्याचा आरोप एएफपी, एपीआयजी व एसईपीएम यांसारख्या वृत्त माध्यमांनी लावला आहे. 

गुगल करणार भारतात ₹७५,००० कोटींची गुंतवणूक !

एएफपीला पाठवलेल्या निवेदनात गुगलच्या प्रवक्त्याने संबंधित निर्णयावरून गुगल ‘अतिशय नाराज असल्याचे’ म्हटले आहे. “संपूर्ण वाटाघाटीच्या काळात आम्ही पूर्णपणे चांगल्या उद्देशाने वागलो आहोत. आमच्यावर आकारण्यात आले दंड आमच्या प्रयत्नांना प्रदर्शित करत नाही अथवा आमच्या व्यासपीठावर आम्ही वापरलेल्या बातम्यांच्या सामग्रींनाही  अनुसरून नाही.” सद्याचे निर्णय हे मे, २०२० ते सप्टेंबर २०२० या काळातील वाटाघाटींच्या संदर्भातील आहे. त्या नंतरच्या काळापासून आम्ही वृत्तसंस्था व प्रकाशकांशी सामायिक आधारावर नियमितपणे चर्चा करत आलो आहोत, असेही गुगलने म्हटले आहे.

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: