न. प. गोंदियातील वरिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी व परिचर एसीबीच्या सापळ्यात

ब्रेनवृत्त | प्रतिनिधी

गोंदिया, ३१ ऑगस्ट

गोंदिया जिल्हा परिषेदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ सहायक लेखाधिकारी रेखा राऊत व परिचर रवीन्द्रा लांजेवार यांना काल एक हजार दोनशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्ह्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे (एसीबी) अटक करण्यात आली आहे. संबंधित लाचखोरांनी झिटाबोडी गावातील सभागृह बांधकामाचे देयक मंजूर करण्याच्या मोबदल्यात कंत्राटदाराला पैशांची मागणी केली होती.

ग्रामीण क्षेत्रातील आधारभूत सुविधांच्या योजनेअंतर्गत झिटाबोडी या गावात सार्वजनिक सभागृह बांधल्याचे देयक कंत्राटदाराला बांधकाम विभागाकडून मंजूर करावयाचे होते. संबंधित देयक मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात लेखाधिकारी व परिचर यांनी कंत्राटदाराकडून १ हजार दोनशे रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार हा कंत्राटदार असून गोंदिया शेजारील दासगाव या गावचा रहिवासी आहे. त्याला झिटाबोडी गावात सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. कंत्राटदाराने निर्धारित कालावधीत बांधकाम पूर्ण केल्यानंतर ३ लाख रुपयांचे देयक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सादर केले होते.

सदर देयक विभागातर्फे नियमित कालावधीत मंजूर न झाल्याने तक्रारदार कंत्राटदाराने बांधकाम लेखाधिकारी रेखा राऊत यांच्याकडे भेट घेतली असता, त्यांनी व परिचराने एकूण १ हजार दोनशे रुपयांची मागणी केली. परंतु लाच देण्याची मुळीच ईच्छा नसलेल्या कंत्राटदाराने जिल्ह्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तक्रारदाराच्या तक्रारीवर कारवाई करत २९ ऑगस्टला सापळा रचला आणि दोघांनाही अटक केली. या दोन्ही लाचखोरांविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे आरोपी राऊत आणि परिचर लांजेवार यांच्याघरी तपासणी सुरू आहे.

संबंधित कारवाई पोलीस निरीक्षक रश्मी दांडेकर व अपर पोलीस निरीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील व सोबतच्या इतर पोलिसांनी केली.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: