शासनातर्फे राष्ट्रीय मालवाहतूक सर्वोत्कृष्टता पुरस्कारांची घोषणा
ब्रेनवृत्त । नवी दिल्ली
देशाच्या अर्थव्यस्थेतील माल पुरवठा क्षेत्राचे (लॉजिस्टिक्स) महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय मालवाहतूक सर्वोत्कृष्टता पुरस्कारां’ची (National Logistics Excellence Awards) घोषणा केली आहे. मालवाहतूक क्षेत्रातील संघटना आणि विविध मंचांचा वापर करणारे उद्योग क्षेत्रातील भागीदार यांच्याशी चर्चा करून या पुस्काराची योजना आखण्यात आली.
राष्ट्रीय मालवाहतूक सर्वोत्कृष्टता पुरस्कार दोन श्रेणींमध्ये देण्यात येतील. पहिल्या श्रेणीत पुरवठ्यासंबंधित पायाभूत सुविधा क्षेत्रातील मालवाहतूकदार/ सेवादात्यांचा, तर दुसऱ्या श्रेणीत मालवाहतूक सेवेचा वापर करणाऱ्या विविध उद्योगांचा समावेश करण्यात आहे. या पारितोषिकांच्या माध्यमातून मालवाहतूक क्षेत्रातील सर्वसमावेशकता, प्रक्रिया मानकीकरण, तांत्रिक अद्ययावतीकरण, डिजिटल रूपांतरण आणि शाश्वत प्रक्रिया अशा कार्यपद्धतींमधील उत्कृष्टतेला पुरस्कृत केले जाणार आहे.
वाचा । आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘आरोग्यसेवा पुरवठा साखळी पोर्टल’ सुरू
“या पुरस्कारांच्या माध्यमातून आम्ही मालवाहतूक सेवा पुरवठादारांपैकी ज्यांनी कामात उत्कृष्टता प्राप्त केली आहे, डिजिटायझेशन आणि तांत्रिकता रुळवली आहे, तसेच ग्राहकोपयोगी सेवा पुरवठा आणि शाश्वत प्रक्रियांचा अवलंब केला आहे, त्यांना पुरस्कृत करून प्रकाशझोतात आणू इच्छितो”, असे मालवाहतूक विभागाचे विशेष सचिव पवन अगरवाल म्हणाले. “वापरकर्त्या उद्योगांच्या संदर्भात, या पारितोषिकामुळे त्यांनी केलेल्या पुरवठा साखळीचे रूपांतरण, पुरवठा क्षेत्राचा विकास, कौशल्य विकास, ऑटोमेशन आणि अशा अनेक बाबींना नवी ओळख होईल”, असेही त्यांनी नमूद केले.
Government launches National Logistics Excellence Awards to give recognition to various players involved in the logistics supply chain. The awards are in 2 categories – logistics infrastructure/service providers & 2nd is for various user industries. pic.twitter.com/HINEDCU8uo
— Prasar Bharati News Services पी.बी.एन.एस. (@PBNS_India) July 19, 2021
नक्की वाचा । अदानी प्रकल्पाचे ऑस्ट्रेलियात गैरकृत्य; समभागधारक विरोधात एकवटले!
कोव्हिड-१९ साथरोगाच्या काळात उद्भवलेल्या उणिवांवर मात करत शेवटच्या टप्प्यातील पुरवठा करणारे स्टार्टअप, शीत संग्रहण सुविधा , ऑक्सिजनची योग्य पद्धतीने वाहतूक आणि गरजूंपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा आणि सेवांचा विनाव्यत्यय पुरवठा यांसारख्या उपाययोजना अनेक संस्थांद्वारे हाती घेण्यात आल्या. नव्याने घोषित करण्यात आलेल्या पारितोषिकांमुळे हे अतिरिक्त प्रयत्न प्रकाशझोतात, असे शासनाचे म्हणणे आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या संकेस्थळावरून विविध संस्थांना पुरस्कारांसाठी नामांकन सादर करण्यास आमंत्रित केले जाईल. मंत्रालयाला प्राप्त नामांकन यादीतून निवड मंडळाद्वारे विजेत्यांची निवड केली जाईल. 31 ऑक्टोबर 2021 रोजी पारितोषिक विजेत्यांची घोषणा कर’ण्यात येईल. राष्ट्रीय ज्युरी फेरीत पोचलेल्या सर्व अंतिम विजेत्यांच्या केस स्टडीज ‘मालवाहतूक सर्वोत्कृष्टता गॅल’रीत (Logistics Excellence Gallery) प्रदर्शित केल्या जातील.
Join @ मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in