“बा! तू जुगार हारलास”

ब्रेनसाहित्य | लेख

कृषीप्रधान भारतात कुठलेही कृषी उत्पादन घेत असताना, त्या पिकासाठी जो काही लागवड खर्च शेतकरी बाप लावतो ती एक प्रकारची निसर्गाशी जुगराची खेळीच! ह्या खेळात त्याच्या हारण्याची संभाव्यता नेहमीच जास्त असते. ह्या खेळात कधी स्वतःच्या स्वप्नांना, तर कधी लहान मोठ्याच्या स्वप्नांना तो डावावर लावतो. जेव्हा या खेळात डावावर लावण्यासाठी काहीच नसतं, तेव्हा  स्वतःलाच डावावर लावून घेतो. ह्या डावात स्वतःच हारल्यावर जेव्हा जीवनवाटांचे संपूर्ण मार्ग बंद होतात, तेव्हा शेतकरी बाप आपली जीवयात्रा संपवून घेतो.

असाच ह्या साली बापानं निसर्गाशी खेळलेला हा जुगार बाप हारला! ह्या सालात बापानं खेळलेला जुगार तो स्वतः नाही हरला. तर त्याला हरविण्यासाठी जाळं विणल्या गेलं आणि त्यामध्ये तो फसला. वर्षानुवर्षे ज्या महामंडळच्या बियाण्याला डोळे लाऊन वावरत पेरायचा ना ते बियाणच बोगस निघालं. पहिल्या वहिल्या वेळेलाच जिवाचं रान करतं पेरणीसाठी पैसे गोळा केले. गावाच्या शिवरापासून ते शेगांव, पंढरपूरपर्यंतच्या देवाचे नाव घेत पेरणी केली.

गेल्या वर्षी मळणीच्या वेळी हातातोंडाशी आलेल्या घास  आस्मानी संकटात गेला! पिकाला जागच्या जागी कोंब फुटली. दिवाळी सारखी दिवाळी, पण पैसे नव्हते म्हणून तीही साजरी करता आली नाही.

प्रातिनिधिक छायाचित्र

ह्या भारतात आधी कृषी व्यवस्था एवढी प्रबळ होती की “जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा, वो भारत देश है मेरा” असे वर्णन असायचे. भारत देशातील नागरिकांना खायला पुरेस नव्हतं, म्हणून शासनाला दुसऱ्या देशातून अन्न आणायला लागायचं (आयात करायचं), तेव्हा “जय जवान, जय किसान” नारा पंतप्रधानांसाहित मनावर बिंबवत भारताला जगवायची जबाबदारी ह्याच शेतकरी बापानं आपल्या खांद्यावरती घेतली.

ह्या भारतात संक्रमित बी-बियाण्यांचे, औषधांचे आक्रमण झालं ते वेगळंच. ह्यामुळे उत्पादन वाढलं, परंतु ह्या विरुद्ध लागवड खर्च विचारात घेता, उत्पादनाच्या तुलनेत उत्पन्न हे वाढण्याऐवजी घटलं! म्हणूनच वर्षानुवर्षे निसर्गाशी खेळत आलेला जुगार कधी पूर्ण हारत, तर कधी स्वतःला सावरत डगमगत्या पाऊलांनी बाप मार्गक्रमण करीत होता. ह्या मार्गावर डोंगराएवढया संकटांशी लढतांना कधी कधी त्याची हत्या व्हायची, पण त्याला लेबल आत्महत्येच लागायचं!

गेल्या २०१९ मध्ये पहिल्या अकरा महिन्यात जवळपास ११०० शेतकरी बापांच्या आत्महत्या झाल्या. म्हणजेच, महिन्याला १००, दिवसाला ३ आणि प्रत्येक ८ तासात एक आत्महत्या!

“शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु”, “लागवड खर्चाच्या दीडपट पिकाला भाव देऊ”, असे निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करायची सोडाच, परंतु पिकाला हमीभाव सुद्धा नाही. भाव चांगला असला, तर तो माल, त्या वर्षी, त्याच वेळेला दुसऱ्या देशातून आयात होईल, आणि देशातील मालाच्या किंमती पडल्या जातील. आणि परत निवडणुका आल्या की पुन्हा तोच एकदा आश्वासनाचा भडीमार!

निसर्गाशी दरवर्षी जुगार खेळतांना मातीत टाकलेल्या हजारो रुपयांसाठीची त्याने केलेली तडजोड ही ह्या शेतकरी बापालाच माहिती असते. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा टाकलेले हजारों रुपये (तिंबार पेरणी) हा डाव संपण्याआधीच “बा! तू हा जुगार हरलास…”

लेख : तुषार भा. राऊत

ई-पत्ता : rautt9948@gmail.com

मो. नं. ८४०७९६३५०९

◆◆◆

(इथे प्रकाशित होणाऱ्या लेख, साहित्य व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)

Join @marathibraincom

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: